Vijay Shivtare with Anantrao Thopte Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : जुन्या गोष्टी विसरू नका! शिवतारे पवारांविरोधात आक्रमक, बड्या नेत्याला घातलं साकडं

Chaitanya Machale

Pune News : लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) सर्वांचे लक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे. या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या निवडणूक लढविणार असून, त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात सतत नव्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. माजी मंत्री विजय शिवतारेंच्या आक्रमक भूमिकेमुळे बारामतीत तिहेरी लढत होणार असल्याची चर्चा आहे.

बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे शिवतारे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता लोकसभेची निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात उमेदवार देण्याचे जाहीर करत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे अजितदादांना मात देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले आहेत. आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना निवडणूक लढवताना मदत व्हावी, यासाठी पवार यांनी गेल्या आठवड्यात अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती.

त्यातच आता शिवतारे (Vijay Shivtare) यांनीदेखील अनंतराव थोपटे यांची भेट घेत ' जुन्या गोष्टी विसरू नका, आता आम्हाला साथ द्या,' अशी साद घातली आहे. पवारांचा पराभव करण्यासाठी या निवडणुकीत उभा राहणार असून, त्यासाठी तुमचा आशीर्वाद द्या, अशी विनंती शिवतारे यांनी थोपटे यांच्याकडे केल्याचे समजते. पवार कुटुंबीयांबद्दल बारामती लोकसभेमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे. वर्षानुवर्षे पवार इथून नेतृत्व करत आहेत. मात्र, आता बास झाले, बारामती म्हणजे पवार कुटुंबीयांची जहागीर नाही, असे म्हणत शिवतारे यांनी पवारांच्या विरुद्ध दंड थोपटले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवार हे सध्या सहभागी झाले आहेत. बारामतीमधून सुळे यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. त्यासाठीची व्यूहरचना अजित पवारांनी तयार केली आहे. मात्र, माजी मंत्री शिवतारे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत उडी घेतल्याने ही निवडणूक अधिकच रंगतदार ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवतारे यांनीदेखील आता थोपटे यांची भेट घेत जुन्या गोष्टी विसरू नका, असे आवाहन केले आहे.

पुरंदरमधील मतदार आपल्यामागे आहेत. हा लोकशाहीतील वाद असल्याने विरोधातील लोकांनाही संधी देणं आवश्यक आहे. शरद पवारांनी 1999 च्या निवडणुकीत तुम्हाला पाडलं होतं. अजित पवारांनी जाहीर सभेत आपली लायकी काढली होती. त्यामुळे आता मागे हटू नका. मला साथ द्या, पुरंदरचे लोक म्हणतात की आम्ही नोटाला मत देऊ, पण पवारांना मत देणार नाही. त्यामुळे मी निवडणूक लढवत आहे, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे, अशी साद शिवतारे यांनी थोपटेंना घातली आहे.

(Edited By - Rajanand More)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT