Election department - police team
Election department - police team Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : निवडणूक विभागाच्या पथकाची पुन्हा धडक कारवाई; पकडली तब्बल लाखो रुपयांची रोकड

Chaitanya Machale

Pune news : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अधिक वेगाने सुरुवात झाली आहे. राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार निवडणुकीत आपल्यालाच मतदान मिळावे, यासाठी जोरदात तयारी करत आहेत. या निवडणुकीच्या काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार राजकीय पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यंत्रणा उभारली आहे. यासाठी विविध पथकांची निर्मितीदेखील करण्यात आली आहे.

निवडणूक विभाग आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत 27 लाख रुपयांची रोख रक्कम पकडली. वाकड-हिंजवडी पुलाखाली नाकाबंदी करण्यात आली होती. त्या तपासात ही रक्कम जप्त करण्यात आली. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या पुणे शहर, बारामती, मुळशी आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. बारामती लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान होणार असून, उर्वरित तीनही मतदारसंघात 13 मे ला मतदान होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मावळ (MAVAL) लोकसभा मतदारसंघासाठी 18 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघातील राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. त्यासोबतच प्रशासनानेदेखील जोरदार तयारी केली आहे. कोणताही चुकीचा प्रकार होऊ नये, यासाठी शहरातील विविध भागात नाकाबंदी केली जात आहे. रात्रीबरोबरच दिवसाही नाकाबंदी करत संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.

मंगळवारी रात्री मुंबईकडून वाकडच्या दिशेने एक चारचाकी गाडी येत होती. पथकाने गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडीत रोकड मिळून आली. गाडीतील व्यक्ती व्यावसायिक असल्याचे सांगत होती. मात्र, त्याला त्याच्याकडे असलेल्या रोख रकमेची कोणतीही माहिती देता आली नाही. त्यामुळे ही रोख रक्कम आणि गाडी जप्त करण्यात आली.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी पुणे लोकसभा अंतर्गत येणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघात तीन लाख 80 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती. कसबा मतदारसंघात निवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्या पथकाने ही कारवाई केली होती. पुणे (PUNE) लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

फरासखाना पोलिस (POLICE) स्टेशन अंतर्गत शनिवारवाडा येथील गेटसमोर दुपारच्या वेळेत एका व्यक्तीकडून पथकाने ही रक्कम जप्त केली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने ठराविक मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम बाळगता येत नाही. बाळगलेल्या रकमेची माहिती संबंधित पथक तसेच पोलिस अधिकाऱ्यांना द्यावी लागते. या घटनेत पथकाला कारवाईत सापडलेल्या रोख रकमेबाबत संबंधित व्यक्तीला योग्य स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही रक्कम जप्त करून जिल्हा कोषागार कार्यालयात जमा केली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT