Sarkarnama
पुणे

Amol Kolhe News : 'ते पराभवाचा बदला घेण्यासाठी, तर मी... ', अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा!

Loksabha Election 2024 : एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी फोडून झाली तरीसुद्धा 'मनसे'ला बरोबर घेताय, असं म्हणाले आहेत.

Chaitanya Machale

Pune Political News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, दररोज नवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले असून, विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे महायुतीकडून निवडणूक लढविणार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असून, त्यांच्या विरोधात कोण निवडणूक लढणार याबाबत गेले काही दिवसांपासून मोठी उत्सुकता होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आठ महिन्यांपूर्वी पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शिंदे - फडणवीस सरकारने अजित पवार(Ajit Pawar) यांना उपमुख्यमंत्री पद बहाल केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शिरूरचे खासदार डॉ. कोल्हे आपल्या गटात येतील, असे उपमुख्यमंत्री अजितदादांना वाटत होते.

मात्र, डॉ. कोल्हे यांनी शरद पवार यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतल्याने या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार डॉ. कोल्हे यांचा पराभव करण्याचा संकल्प अजितदादांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीच्या जागावाटपामध्ये शिरूर मतदारसंघ अजितदादांच्या वाट्याला आलेला आहे. त्यामुळे खासदार कोल्हे यांच्या विरोधात कोण उभे राहणार याबाबत गेले काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. या मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील(Shivajirao Adharao Patil) निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होती.

मात्र, राष्ट्रवादीमधील काही पदाधिकाऱ्यांचा त्याला विरोध असल्याने त्यांचे नाव जाहीर केले जात नव्हते. अजितदादांनी यामध्ये हस्तक्षेप करत राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांची नाराजी दूर केली आहे.

माजी खासदार आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना शिरूरची उमेदवारी देण्यात येणार आहे. 26 मार्चला प्रवेश होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकी खासदार कोल्हे(Amol Kolhe) यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचे वक्तव्य आढळराव पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार डॉ. कोल्हे यांनी शनिवारी समाचार घेतला.

अमोल कोल्हे म्हणाले, '2019 चा बदला घेण्यासाठी आढळराव पाटील निवडणूक लढणार असतील, तर माझा प्रश्न आहे एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का? फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्या माणसाला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे का ? दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीला सामोरे जाण्याचा कोणाचा काय हेतू आहे, हेदेखील त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.'

तसेच 'त्यांना पराभवाचा बदला घ्यायचा आहे. मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य नागरिकांचा, महाराष्ट्रातील जनतेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा, यासाठी मायबाप जनतेकडे मी आशीर्वाद मागतोय. त्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. मायबाप जनता सूज्ञ आहे,' असंही कोल्हे म्हणाले.

भाजप जेमतेम 200 चा आकडा गाठेल! -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे केंद्रातील नेते अमित शाह यांच्या भेटीवर बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, कोणी महायुतीत जाणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण यापद्धतीने जे प्रकार सुरू आहेत त्यामध्ये भाजपचा कॉन्फिडन्स खचलेला दिसतोय. अब की बार 400 पार म्हणत असताना जेमतेम ते 200 चा आकडा ते गाठू शकतील अशी वस्तुस्थिती आहे.

तसेच एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी फोडून झाली तरीसुद्धा मनसेला बरोबर घेताय, तरी ही परिस्थिती भाजपला अनुकूल अशी नाही, हे लक्षात येत आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा येत्या निवडणुकीत नक्की दिसेल, असंही अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT