आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासाठी महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत होणार आहे. आघाडीतील प्रमुख पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार असून सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्मुला अंतिम होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कदाचित हा फॉर्मुला आजच जाहीर केला जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे. दुसरीकडे या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाहीत. कारण त्यांची पु्ण्यातील एसएसपीएमएस मैदानात महासभा होणार आहे.
महाविकास आघाडीकडून (MVA) जागावाटपाबाबत आतापर्यंत दोन ते तीन बैठका झाल्या आहेत. या बैठकांनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून 40 जागांवरती एकमत झालं असून आठ जागांबाबत तिढा कायम सांगण्यात येत होतं.
आज या आठ जागांचा तिढा सोडून लोकसभा निवडणुकीसाठीचा (Loksabha Election) मविआचा फार्म्युला अंतिम होणार असल्याचं बोललं जात आहे. पण या बैठकीला महाविकास आघाडीचा भाग होऊ इच्छिणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे.
याबाबत प्रकाश आंबेडकरांना जयंत पाटील यांनी फोन करून निमंत्रण दिलं आहे. पण पुण्यातील सभा पूर्वनियोजित असल्याने आजच्या बैठकीला येणार नसल्याचे आंबेडकरांनी कळवलं आहे. त्याचवेळी ही बैठक 28 फेब्रुवारीला घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली होती. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही विनंती मान्य केली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर काहीसे नाराज असल्याचं बोललं जात आहे.
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडण्यासाठी सत्ता परिवर्तन महासभा एसएसपीएमएस मैदानात घेत आहे. एकीकडे मविआची बैठक (MVA Seat Sharing Meeting) सुरू असताना दुसरीकडे आंबेडकर यांची सभा घेणार आहेत. त्यामुळे गेल्या काही काळापासून जागावाटपावरून नाराज असलेले प्रकाश आंबेडकर पुण्याच्या महासभेतून वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रकाश आंबेडकरांना मविआमध्ये सामावून घेण्याबाबत सर्व पक्षांनी सकारात्मकता दाखवली असली तरी 'वंचित'ला किती जागा देणार, याबाबत कुणीही काही बोललेलं नाही. तसेच मविआने दिलेल्या एक-दोन जागांवर निवडणूक लढण्यास आंबेडकर ही तितके इच्छुक दिसत नाहीत. त्यामुळे पुण्यातील या सभेमधून प्रकाश आंबेडकर वेगळी वाट धरून 'एकला चलो'चा नारा देऊ शकतात, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
त्यामुळे मविआच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटणार की आणखी गुंता वाढणार हे स्पष्ट होईल तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत राहणार की महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणार, हे देखील स्पष्ट होऊ शकतं.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.