Muralidhar Mohol | Medha Kulkarni |Jagdish Mulik Sarkarnama
पुणे

Loksabha Election 2024 : मेधा कुलकर्णींना राज्यसभेची 'लॉटरी'; पुणे लोकसभेसाठी आता 'मराठा' उमेदवार

Maharashtra Political News: राज्यसभेसाठी प्रा. मेधा कुलकर्णी यांना भाजपची संधी; लोकसभेची गणिते बदलणार.

Chaitanya Machale

Pune Political News : राज्यसभेसाठी भाजपने कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने जाहीर केलेल्या राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीत मेधा कुलकर्णी यांचे नाव आहे. केंद्रासह अनेक राज्यांमध्ये भाजपाचे संख्याबळ पाहता मेधा कुलकर्णी यांचा विजय सहज असून त्या खासदार होणार हे निश्चित झाले आहे.

भाजपने प्रा. कुलकर्णी यांना थेट राज्यसभेसाठी संधी दिल्याने पुणे लोकसभेची गणिते बदलणार आहेत. आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रचारक सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे. या सर्व इच्छुकांनी गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेसाठी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे.

भाजपच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट या दोघांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे भाजपकडे ‘ब्राम्हण’ समाजाचे प्रतिनिधीत्व नाही. आमदार टिळक यांच्या निधनानंतर त्यांचे पती शैलेश टिळक, सुपुत्र कुणाल टिळक किंवा त्यांच्या परिवारातील व्यक्तीला भाजप संधी देईल, अशी चर्चा होती.

मात्र कासब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न देण्याचा निर्णय घेत धक्का दिला होता. पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना पक्षाने पोटनिवडणुकीसाठी संधी दिली होती. त्यावेळी भाजपने 'ब्राह्मण ' समाजाला डावल्याची चर्चा सुरू झाली होती.

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेचे उमेदवारी देऊन नाराज झालेल्या ब्राह्मण समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. कुलकर्णी यांना राज्यसभेसाठी संधी दिल्याने पुणे लोकसभेची गणिते आता बदलणार आहेत.

लोकसभेसाठी आता भाजपकडून मराठा उमेदवार दिला जाण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेला मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचा संघर्ष आणि त्याबाबत राज्य सरकारने घेतलेली भूमिका यामुळे आता पुणे लोकसभेसाठी भाजप मराठा कार्ड काढण्याची शक्यता अधिक वाढली आहे.

मोहोळ, मुळीकांमध्ये चुरस

प्रा. मेधा कुलकर्णी (Medha kulkarni) यांना भाजपने संधी दिल्याने लोकसभेसाठी इच्छुक असलेले सुनील देवधर यांचे नाव आता काही प्रमाणात मागे पडले आहे. तर माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्यामध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा होणार आहे.

SCROLL FOR NEXT