Pune News: लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या सोबत एकत्र येत मोठा राजकीय प्रयोग केला आहे. याला आता ‘लोणावळा पॅटर्न’ म्हणून ओळखलं जात आहे.
या नव्या समीकरणानुसार अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोणावळ्यातील गवळीवाडा भागात आपले उमेदवार उतरवले नाहीत आणि थेट काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेससोबत शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉग्रेस देखील आघाडीत आहेत. यामुळे काँग्रेसचा विचार नगरपरिषदेत टिकावा आणि भाजपला पर्याय मिळावा हाच या आघाडीमागचा मुख्य उद्देश असल्याचं अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केलं.
“काँग्रेसचा विचार टिकवण्यासाठी नगरपरिषदेत आपलेही उमेदवार असणं गरजेचं आहे. त्यामुळेच आज आम्ही ही आघाडी करत आहोत,” असं काँग्रेसकडून देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
लोणावळ्यातील नागरिकांना पर्याय हवा होता आणि आम्ही या आघाडीच्या माध्यमातून हा पर्याय निर्माण करून दिला आहे. राज्यात, देशात काही झालं तरी गवळीवाडा येथे मात्र फक्त पंजाच चालतो. त्यामुळे या भागातून दोन उमेदवार हे नगरपालिकेत आले पाहिजेत याच दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण उमेदवार दिले नसल्याचे देखील शेळके यांनी स्पष्ट केलं.
या घोषणेनंतर आमदार सुनील शेळके यांनी स्वतः गल्लोगल्ली फिरून काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला आणि मतदारांना त्यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. काँग्रेस ,शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षातील राजकीय वैर लक्षात घेता, लोणावळ्यातील हा प्रयोग राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपविरोधात एकजूट दाखवण्याच्या या ‘लोणावळा पॅटर्न’चा भविष्यात इतर ठिकाणीही राबवला जाईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.