Pune News : निवडणुकीनंतर पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. या पहिल्याच सभेत पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना धक्का बसला. पर्वती मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी ३२.८३ कोटी रुपये देण्याचे विषयपत्र महापालिका प्रशासनाने मागे घेतले. त्यावर यामतदारसंघातील एकाही नगरसेवकाने हरकत घेतली नाही, त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मतदारसंघात रस्ता डांबरीकरण, पादचारी मार्गाची दुरूस्ती, पावसाळी गटार यासह अन्य कामांसाठी महापालिका अधिनियमातील ७२ (ब) या कलमान्वये ३२.८३ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव प्रशासनाला दिला होता. त्यानुसार या निधीची पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा प्रस्ताव बुधवारी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता.
कलम ७२ (ब) ची तरतूद ही मोठ्या प्रकल्पांसाठी केली जाते. ती नियमित कामांसाठी केली जात नाही. यास वित्त समिती, स्थायी समितीचीही मान्यता प्रशासनाने दिली होती. पण याबाबत आयुक्त नवल किशोर राम यांनी हा प्रस्ताव मंजूर न करता तो पुढे ढकलावा, असे आदेश दिल्यानंतर तो सर्वसाधारण सभेच्या पुढे ठेवण्यात आला. याबाबत आयुक्तांना विचारल्यानंतर त्यांनी मी हा प्रस्ताव पुढे ढकलण्यास सांगितले होते असे स्पष्ट केले.
आयुक्तांनी तत्कालीन पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर एकच धावपळ उडाली. अखेर हे विषयपत्र आज सर्वसाधारण सभेत मागे घेण्यात आले. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पत्रावरून हा निधी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. प्रशासनाकडून हा प्रस्ताव मागे घेतला जात असताना भाजपचे नगरसेवक काहीच बोलले नाहीत.
काँग्रेस नगरसेवक आले धावून
भाजपचे नगरसेवक शांत बसल्याचे पाहून काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी ‘‘कोणी तरी या प्रस्तावावर बोला’’ असे वक्तव्य करून भाजप नगरसेवकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तरीही कोणीच काही बोलले नाही. याची चर्चा आज सर्वसाधारण सभेत रंगली होती. पर्वती मतदारसंघातील एकाही नगरसेवकाने त्यावर अवाक्षरही काढले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.