Mahadev Jankar
Mahadev Jankar Sarkarnama
पुणे

महादेव जानकर करणार भाजपची गोची; बारामती स्वबळावर लढण्याची घोषणा!

संतोष आटोळे

इंदापूर (जि. पुणे) : बारामतीसह (Baramati) राज्यातील लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्ष (RSP) स्वबळावर आणि पूर्ण ताकदीने लढवणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथवर दहा यूथ (युवक) तयार करावेत, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केले. (Mahadev Jankar's announcement to contest Baramati Lok Sabha constituency on his own)

दरम्यान, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने बारामती लोकसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने भारतीय जनता पक्षाची अडचण होण्याची शक्यता आहे. भाजपने बारामती मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा, हे उद्दिष्ठ ठेवून त्यादृष्टीने व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. संपूर्ण तयारीने बारामतीत उतरणाऱ्या भाजपला महादेव जानकर यांचा पक्ष अडचण ठरण्याची शक्यता आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतदारसंख्या मोठी आहे. त्यामुळे जानकर यांना मानणार वर्गही या मतदारसंघात आहे. लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत जानकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना तुल्यबळ टक्कर दिली होती, त्यामुळे जानकर यांनी आपल्या पक्षाचा स्वतंत्र उमेदवार दिला ते कोणाच्या पथ्यावर पडणार आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे भाजप जानकर यांची कशी समजूत घालणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, इंदापूर येथे राष्ट्रीय समाज पक्ष बारामती लोकसभा मतदार संघ बूथ प्रमुख संपर्क अभियानातंर्गत इंदापूर येथे बोलताना आमदार जानकर यांनी स्वबळाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीसाठी ‘वन बूथ टेन यूथ’ या संकल्पनेनुसार पक्षाची विस्तारवाढ करण्यासाठी प्रत्येक बूथपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. आगामी निवडणुकांमध्ये गाफील न राहता सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या हेतूने कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावांमध्ये प्रत्येक बूथवर दहा दहा माणसे तयार केली पाहिजेत.

या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्याचे मुख्य महासचिव माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे, पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे, पुणे जिल्हा सरचिटणीस संतोष कोकरे, ज्येष्ठ नेते विनोदराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, तानाजी मारकड, तालुकाध्यक्ष सतीश तरंगे आदींसह गावोगावीचे पक्षाचे बुथ प्रमुख उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT