Pune News: राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. बहुप्रतिक्षित 'पवित्र' पोर्टलद्वारे किमान १३ हजार नवीन शिक्षकांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मात्र, एकीकडे भरतीचे ढोल वाजत असताना काही जाचक धोरणामुळे उमेदवारांमध्ये काहीसा नाराजीचा सूरही उमटत आहे.
भरती प्रक्रिया राबवण्यासाठी शिक्षण विभागाने आता कंबर कसली आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांना ३१ मे २०२६ पर्यंत रिक्त पदांच्या जाहिराती पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे कडक आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, मे अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या संभाव्य जागांचाही यात समावेश करण्यात येणार आहे. जून महिन्यात पात्र उमेदवारांना शाळांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत.
राज्यात प्रत्यक्षात ४० ते ४५ हजार शिक्षकांची भरती होणे अपेक्षित होते. मात्र, १५ मार्च २०२४ च्या नव्या संचमान्यता निकषांमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या निकषांमुळे राज्यभरात तब्बल ३० हजार शिक्षक 'अतिरिक्त' ठरले आहेत. शासनाने या अतिरिक्त शिक्षकांचे आधी समायोजन करण्याचे धोरण अवलंबल्याने नवीन भरतीच्या जागा ८ ते १३ हजारांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. यामुळे १.७० लाख पात्र उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भरती ही कोणत्याही मुलाखतीशिवाय, केवळ गुणवत्तेवर होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, खासगी शिक्षण संस्थांना एका जागेसाठी १० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे खासगी संस्थांमध्ये पुन्हा एकदा 'वशिलेबाजी' फोफावणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.