Deepak Mankar, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Pune NCP Politics : 'आपल्याला योग्य वेळी…', अजितदादांचा 'तो' वादा अन् दीपक मानकरांचे बंड झाले थंड

Jagdish Patil

Pune News, 18 Oct : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 7 आमदारांना शपथ देण्यात आली. मात्र, या आमदारांच्या यादीत स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) (NCP) पक्षात नाराजीनाट्य सुरू झालं होतं.

पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आपणाला पक्षाने डावलल्याचं सांगत पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. त्यांनंतर शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले होते. मात्र, आता अखेर नाराज मानकरांची समजूत काढण्यात अजितदादा यशस्वी झाले आहेत.

त्यामुळे आता मानकरांचं (Deepak Mankar) बंड थंड झालं असून याबाबतची माहिती खुद्द दिपक मानकर यांनी दिली आहे. या सर्व प्रकरणाबाबत त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भेट घेतली.

यावेळी अजितदादांनी 'आपल्याला योग्य वेळी योग्य न्याय दिला जाईल' असा वादा दिल्याचं मानकर यांनी सांगितलं. शिवाय अजितदादा पुणे शहर कार्यकारणीच्या कामावर समाधानी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मानकर यांनी निवेदनात म्हटलं की, "माझ्यावर विश्वास ठेऊन पुणे शहरातील 850 पेक्षा जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सामूहिक राजीनामे दिले आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. गेल्या काही दिवसात आपल्या पक्षात घडलेल्या घटनांची योग्य दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी (ता.18) रोजी सकाळी प्रदेश कार्यालय, मुंबई येथे वेळ देत माझी भेट घेऊन शहराध्यक्ष या नात्याने पुणे शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.

अजितदादा हे पुणे शहर कार्यकारिणीवर समाधानी आहेत. त्यांचे पुण्यातील कार्यकर्त्यांवर विशेष प्रेम असून कोणत्याही पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, असं ठामपणे सांगितलं. शहरातील सर्वच कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आपण तयार केलेले संघटन कौतुकास्पद असून त्यांच्या बळकटीसाठी आणि पक्षवाढीसाठी उपयोगी होणाऱ्या विधानपरिषदेसाठी आपण मागणी केली होती.

परंतू काही कारणास्तव ती मागणी पूर्ण करता आली नाही. तरी येत्या काळात योग्य वेळी योग्य न्याय दिला जाईल." तसंच, शहरातील सर्वच कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या कामाची प्रशंसा करत अजितदादांनी या कार्याची योग्य पोचपावती लवकरच दिली जाईल असा ठाम विश्वास मला दिल्याचंही मानकर यांनी सांगितलं.

तर पुणे (Pune) शहर आपला बालेकिल्ला असून कोणत्याही कार्यकर्त्यांनी नाराज न होता येत्या विधानसभेत महायुतीचे जोमाने काम करून आपल्या पक्षाची ताकद दाखवून देऊया. मी आपल्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा शब्द अजितदादांनी दिला आहे. त्यामुळे आता आम्ही आमची एकी अशीच ठेऊन आम्ही येत्या विधानसभेला जोमाने सामोरे जाणार आहोत, असं दीपक मानकर यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT