Deputy CM Sunetra Pawar attending her first state cabinet meeting chaired by CM Devendra Fadnavis on February 10, 2026, where historic decisions for Pune's infrastructure and industrial growth were sanctioned. Sarkarnama
पुणे

Cabinet Meeting : सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीतील पहिल्याच कॅबिनेटवर 'अजितदादांच्या' स्वप्नांची छाप : पुणे जिल्ह्यासाठी 3 महत्त्वाचे निर्णय मार्गी

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुरंदर विमानतळ, इंदापूर एमआयडीसी आणि बारामती क्रीडा संकुलासह पुणे जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाच्या विकासकामांना ऐतिहासिक मंजुरी देण्यात आली आहे.

Hrishikesh Nalagune

Cabinet Meeting : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मंगळवारी (10 फेब्रुवारी) मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देखील ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक होती. या संपूर्ण बैठकीअजितदादांच्या स्वप्नाची छापही दिसून आली. त्यांच्या स्वप्नातील पुणे जिल्ह्यासाठीचे 3 मोठे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी आग्रही भूमिका घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकल्पाला गती देण्यासाठी, भुसंपादन व अनुषांगिक बाबींसाठी 6 हजार कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे.

एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांची सहभागीदारी असणार असून त्यांच्याकडे भागीदारीनुसार कर्ज फेडीची जबाबदारी देण्यात आली आहे. या कर्जाला शासन मान्यता व हमी देण्यास मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जून 2026 पर्यंत भुसंपादन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

इंदापूरमध्ये नवी एमआयडीसी व्हावी यासाठी अजित पवार प्रयत्नशील होते. त्याच प्रयत्नांना आज पंख मिळाले आहेत. इंदापूर तालुक्यातील जंक्शन परिसरामध्ये होणाऱ्या एमआयडीसीसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील तब्बल 1 हजार एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

यापूर्वी जंक्शनच्या एमआयडीसीसाठी १३१ हेक्टर जमीन प्रस्तावित करण्यात आली होती. पण वाढीव 1 हजार एकर जमिनीची मागणी केली होती. अजितदादांनी इंदापूकरांना वाढीव जमीन देण्याचे वचन दिले होते. शासनाच्या निर्णयामुळे इंदापूरच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळाली मिळणार असून दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न साकार होणार आहे.

बारामतीमध्ये क्रीडा संकुलाचा प्रस्तावही मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. बारामती एमआयडीसीतील कटफळ रेल्वे स्थानकानजीक असलेल्या 25 एकराच्या भूखंडावर क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने भव्य क्रीडा संकुल उभारण्याचे अजित पवार यांचे स्वप्न होते. त्या दृष्टीने त्यांनी सातत्याने पाठपुरावाही केलेला होता, अनेक भाषणांमधून त्यांनी याचा उल्लेखही केला होता.

बारामती जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत मौजे कटफळ येथील क्रीडा सुविधांसाठी ७५ कोटी १३ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. यातून ८० हजार चौरस मीटरवर पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान अशा सुविधा उभारण्यात येणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या क्रीडा मंत्रालयाकडूनच हे संकुल उभारले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT