Maharashtra Cooperative Department will get 21 new electric cars worth ₹3.15 crore for regional officers, with another 21 vehicles planned. Sarkarnama
पुणे

Cooperative Department : सहकार विभागात 21 आलिशान कारचा ‘शाही’ ताफा; सुनेत्रा पवार अधिकाऱ्यांकडे चाव्या करणार सुपूर्द

Maharashtra Govt Vehicles : सहकार विभागातील क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जुन्या वाहनांमुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने नवीन वाहन खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २१ इलेक्ट्रिक चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली असून, त्यासाठी तब्बल ३ कोटी १५ लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 20 Sep : सहकार विभागातील क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या दिमतीला आता तब्बल २१ नवीन इलेक्ट्रिक चारचाकी वाहने दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सोमवारी या वाहनांच्या चाव्या संबंधित अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे सहकार विभागात नव्या वाहनांच्या ताफ्याची चर्चा रंगली आहे.

सहकार विभागातील क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जुन्या वाहनांमुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने नवीन वाहन खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २१ इलेक्ट्रिक चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली असून, त्यासाठी तब्बल ३ कोटी १५ लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, दुसऱ्या टप्प्यात आणखी २१ वाहने खरेदी केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सहकार विभागाच्या वाहन ताफ्यात आणखी भर पडणार आहे. नवीन वाहनांच्या वितरणाचा कार्यक्रम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वक्तृत्व सभागृहात सोमवारी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सहकार आयुक्त व निबंधक, पुणे तसेच त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयांसाठी निर्लेखित झालेल्या जुन्या वाहनांच्या जागी ही नवीन वाहने देण्यात येणार आहेत. त्यासाठी १० जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली होती.

शासनाच्या वाहन वापराच्या धोरणानुसार तसेच वित्त विभागाने सप्टेंबर २०२५ मध्ये दिलेल्या सुधारित किंमत मर्यादेच्या सूचनांनुसार ही खरेदी करण्यात आली आहे. या नव्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. सहकार विभागात यापूर्वी २०१२ मध्ये वाहनांची खरेदी करण्यात आली होती. तब्बल १४ वर्षांनंतर नवीन धोरणानुसार इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी होत असल्याने विभागातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कुठे जाणार २१ गाड्या?

शासनाच्या निर्णयानुसार विभागीय सहनिबंधक, लेखापरीक्षणाच्या कार्यालयांसाठी विभागनिहाय सात वाहने, तर पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकसाठी प्रत्येकी वाहनाचा समावेश आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयांसाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, यवतमाळ, सांगली, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड, बुलढाणा, रत्नागिरी, पुणे शहर, धुळे आणि नाशिक या कार्यालयांसाठी १२ वाहने देण्यात येणार आहेत.

मुंबईतील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयासाठीही एक वाहन देण्यात येणार आहे. एकीकडे सहकार विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी नव्या इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा उभा राहत असताना, दुसरीकडे दुसऱ्या टप्प्यात आणखी २१ वाहनांची खरेदी होणार असल्याने सहकार विभागाचा ‘ईव्ही ताफा’ आणखी वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT