Pune News, 05 Jul : राज्यातील फळ पीक विमा योजनेत मोठा गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कृषी विभागाने आता बोगसगिरी करणाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. फळ पीक विमा योजनेत खोटे किंवा बोगस दस्तऐवज सादर करून विमा लाटल्याचे आढळल्यास संबंधित खातेदार शेतकऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
शासनाकडून फळ पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. या विमा योजनेअंतर्गत मृग बहारमधील संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, हळद व अंजीर अशा एकूण १० महत्त्वाच्या फळ पिकांसाठी संरक्षण देण्यात येत आहे. ही योजना राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली आहे. महसूल मंडळाकडून ही योजना अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे.
मात्र, या योजनेमध्ये काही बोगसगिरीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आता बोगसगिरी करणाऱ्या खातेदार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक पुढील पाच वर्षांसाठी थेट 'काळ्या यादीत' टाकण्यात येणार आहे. यामुळे अशा बोगस खातेदारांना पुढील किमान पाच वर्षे कोणत्याही विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे आदेश कृषीआयुक्तालयातील मुख्य सांख्यिक वैभव शिंदे यांनी दिले आहेत. कृषी विभागाच्या या कडक पवित्र्यामुळे फळपीक विम्याच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कर्जदार शेतकऱ्यांसाठी 'घोषणापत्र' बंधनकारक
पुनर्रचित हवामानाधारित फळ पीक विमा योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी व्हायचे आहे की नाही, याबाबतचे घोषणापत्र शेतकऱ्यांनी ज्या बँकेमध्ये पीक कर्ज खाते किंवा किसान क्रेडिट कार्ड खाते आहे, तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबतचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे; जेणेकरून बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही.
हवामान धोके लागू झाल्यासच नुकसानभरपाई
शेतकऱ्यांनी अर्ज करताना 'आपले सरकार सेवा केंद्रांना' केंद्र सरकारने निश्चित केलेले ६० रुपये प्रति शेतकरी अर्ज या दराने विमा कंपन्यांनी सेवा शुल्क द्यावयाचे आहे. मृग बहार २०२६ या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला आहे. निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यासच विमाधारक शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
मृग बहरातील फळपिकांच्या विमा नोंदणीकरिता शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पीकविमा पोर्टलच्या https://pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन वैभव शिंदे यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.