

Mumbai News, 05 : मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के देत आहेत. आधी ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंचे सहा खासदार फोडले, या धक्क्यातून ठाकरे सावरतात तोच ठाकरेंचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या सचिन अहिर यांनाच शिंदेंनी आपल्या गळाला लावलं.
सचिन अहिरांनी ठाकरेंना सोडल्याचं बक्षीस म्हणून त्यांची थेट विधानपरिषदेचे उपसभापतीपद देण्यात आलं. तर एकनाथ शिंदेंनी अहिर यांना आपल्याकडे का घेतलं हे उघड गुपित आहे. शिंदेंना आगामी निवडणुकीत ठाकरेंचा बालेकिल्ला खिळखिळा करायचा आहे, यासाठीच त्यांनी अहिरांना आपल्या पक्षात घेतल्याचं बोललं जात आहे.
अशातच आता वरळी मतदारसंघावर महायुतीचा डोळा आहे. त्या मतदारसंघाबाबत सचिन अहिर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. वरळी विधानसभा मतदारसंघा संदर्भात एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अहिर यांना आगामी निवडणूक वरळी विधानसभा मतदारसंघातून लढवणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी याबाबत आपण अद्याप निर्णय घेतला नसल्याचं म्हटलं आहे.
मात्र, याचवेळी त्यांनी वरळीच्या जागेवर महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरेसेनेची धडधड नक्कीच वाढण्याची शक्यता आहे. कारण वरळी मतदारसंघात अहिर यांची चांगली ताकद आहे. आदित्य ठाकरेंना निवडणून आणण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे आता अहिर जर ठाकरेंच्या विरोधात मैदानात उतरणार असतील तर आगामी विधानसभा ठाकरेंना जड जाणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
शिवाय सचिन अहिर यांनी थेट ठाकरेंनाच ललकारलं आहे. वरळी हा आमचा सातबारा आहे असं वाटत असेल तर आता तसं काही नाहीये, असंही अहिर यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, "शिंदे साहेबांच्या पक्षाची मतं बघितली तर दोन दिवस आधी प्रचार करणाऱ्या माणसालाही ८-९ हजार मते पडली. मी नेहमी सांगतो की, वरळी हा व्हायटल मतदारसंघ आहे. काही जण म्हणतात बालेकिल्ला आहे, तर मग मी त्या बालेकिल्ल्यात कसं निवडून यायचो?" असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शिवाय शिवडी विधानसभेचा ज्यावेळी वरळी मतदारसंघ झाला तेव्हा मी वरळीतूनच निवडून आलो होतो. वरळीचा आमदार झाल्यानंतर तेव्हाच मी मंत्री झालो. वरळी हा व्हायटल मतदारसंघ असून इथले मतदार इमिजिएट रिएक्ट करू शकतात. कोणाला वाटत असेल का वरळी आमचा सातबारा आहे, तर तसं नाही, माझाही नाही आणि कोणाचाही होऊ शकत नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, वरळीकरांनी माझं काम बघितलंय आणि त्यांचही काम बघितलेल आहे. शिवाय मी आता वरळी पुरता संकुचित राहणार नाही. मला आता गल्लीच राजकारण न करता राज्याचं राजकारण करायचं आहे, असं सूचक वक्तव्य करतानाच त्यांनी आपण वरळीत देखील काम करणार असल्याचंही स्पष्ट केलं.
वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत माझी काही चर्चा झालेली नाही. पण मी लढो किंवा दुसरं कोणीही लढो. जागा निवडून आणण्यासाठी जे कष्ट घ्यायचे असेल त्याची तयारी करावी लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय एकनाथ शिंदेंनी माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे आता इथून पुढे पूर्ण ताकतीने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.