Maharashtra Land Survey | 5,000 Private Surveyors | 15 Days Sarkarnama
पुणे

Maharashtra Land Survey : जमीन मोजणीचा वेटिंग संपणार! राज्यात 5 हजार खासगी सर्व्हेअर अन् 15 दिवसांत मोजणी, सरकारचा मोठा निर्णय

Land measurement Maharashtra : जमीन मोजणीच्या प्रकरणांचा निपटारा जलद आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित परवानाधारक भूमापक आणि भूमापन एजन्सी नियुक्त करण्याची योजना आखण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 18 Nov : राज्यातील जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने भूमिअभिलेख विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरात पाच हजार खासगी सर्व्हेअर नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्या माध्यमातून जमीन मोजणीची प्रक्रिया अवघ्या १५ दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जमीन मोजणीसाठी नागरिकांना महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागणाऱ्या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

जमीन मोजणीच्या प्रकरणांचा निपटारा जलद आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित परवानाधारक भूमापक आणि भूमापन एजन्सी नियुक्त करण्याची योजना आखण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमीन मोजणीची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यावर भर दिला जाणार आहे.

या नियुक्ती प्रक्रियेत पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी संबंधित उमेदवारांना १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना जमीन मोजणीच्या कामासाठी नियुक्त करण्यात येणार आहे.

जमीन मोजणीच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित सर्व्हेअर यांच्या मदतीने मोजणी प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे.

भूमिअभिलेख विभागाकडील प्रलंबित मोजणी प्रकरणे निकाली काढण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणार असून, जमीन खरेदी-विक्री, भूखंडांची हद्द निश्चिती, वाटणी तसेच बांधकामविषयक कामांसाठी आवश्यक असलेली मोजणी वेळेत होण्याची अपेक्षा आहे.

१५ दिवसांत मोजणी; नागरिकांना दिलासा

जमीन मोजणीसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागणाऱ्या नागरिकांची गैरसोय कमी होणार आहे. मोजणीची प्रलंबित प्रकरणे जलद निकाली निघाल्यास जमीन व्यवहारांमधील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. राज्यभरात पाच हजार खासगी सर्व्हेअर नियुक्त करण्याच्या निर्णयामुळे भूमिअभिलेख विभागावरील कामाचा ताणही कमी होण्याची शक्यता आहे.

या योजनेअंतर्गत प्रत्येक सर्व्हेअरला महिन्याला किमान २० जमीन मोजण्या करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील जमीन मोजणीच्या प्रकरणांचा निपटारा वेगाने होण्यास मदत होणार आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांना वेळेत सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT