Chhagan Bhujbal Sarkarnama
पुणे

Chhagan Bhujbal: महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून भुजबळांना कोणी बाहेर काढलं, माहितीय का ? आंबेडकरांच्या दाव्यानं चर्चांना उधाण

Ganesh Thombare

चैतन्य मचाले :

Pune News: दिल्ली येथील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तुरुंगाची हवा खाणारे राज्याचे नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच आहे. न्यायाधीशांसमोर आवाज उठविला नसता तर भुजबळ हे बाहेर आलेच नसते. एवढे करूनदेखील जेलमधून बाहेर आल्यानंतर भुजबळ यांनी कधीही आपले आभार मानले नाही, अशी खंत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बोलून दाखविली.

महात्मा फुले यांचा स्मृतिदिन आणि समतादिनानिमित्त फुलेवाडा, समता भूमी येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आंबेडकर आले होते. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना त्यांनी भुजबळ यांना जेलमधून आपणच बाहेर काढल्याचा दावा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्ली येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. राज्यात पाच वर्षांपूर्वी शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना भुजबळ यांची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये दोषी असल्याचा ठपका ठेवत युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांना जेलमध्ये टाकले होते. त्यानंतर अनेक महिने भुजबळ जेलमध्येच होते.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी भुजबळ जेलमधून बाहेर आले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. या निवडणुकीत विजयी झालेल्या भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. काही महिन्यांपूर्वी अजित पवार गटाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत छगन भुजबळ सत्तेत सहभागी झाले.

त्यांना अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री करण्यात आले. ज्या फडणवीस सरकारने सत्तेत असताना भुजबळ यांना जेलमध्ये टाकले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर करण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेत त्याला विरोध करण्यास भुजबळ यांनी सुरुवात केली आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास भुजबळ यांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसीचे नेते अशी आपली ओळख असल्याचे ते सांगतात. सत्तेत सहभागी असलेल्या भुजबळ यांच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते आंबेडकर यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. न्यायालयात न्यायाधीशांना आपण कडक शब्दांत सुनावले नसते तर भुजबळ जेलच्या बाहेर आलेच नसते. त्यांच्यासाठी इतके करूनदेखील जेलच्या बाहेर आल्यानंतर भुजबळ यांनी कधीही आपले साधे आभार मानले नसल्याची खंत आंबेडकर यांनी बोलून दाखविली.

'...तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे जाहीर करावे'

हिंदू राष्ट्र बनविण्याच्या नावाखाली देशाचे संविधान बदलण्याचा घाट सध्या घातला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संविधान बदलणार नाही, असे कितीही म्हणत असले तरी तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे. फडणवीस यांना विचारतं कोण, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. फडणवीस जे म्हणत आहेत तेच मोहन भागवत यांनी जाहीर करावे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT