Maharashtra Education News: राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील (इयत्ता १ ली ते ८ वी) विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन पद्धतीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) नवीन अभ्यासक्रमानुसार मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल घोषित केले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता २ री, ३ री, ४ थी आणि ६ वीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे सुधारित नियम जारी करण्यात आले आहेत. या नव्या रचनेमुळे आता केवळ पारंपरिक पाठांतराऐवजी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कौशल्यांवर, प्रात्यक्षिकांवर आणि सादरीकरणावर अधिक भर दिला जाणार आहे.
नवीन अभ्यासक्रमामध्ये काही विषयांची नावे बदलली आहेत, तर काही इयत्तांमध्ये नवीन विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या विषयांचे मूल्यमापन नेमके कसे करायचे, कोणत्या विषयांसाठी पूर्वीची पद्धत कायम राहणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कौशल्यांना किती महत्त्व द्यायचे, याबाबत शिक्षकांना स्पष्टता असणे आवश्यक आहे.
नवीन अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता ६ वीपासून व्यावसायिक शिक्षण (Vocational Education) हा विषय नव्याने सुरू करण्यात आला आहे. या विषयासाठी १००% आकारिक मूल्यमापन पद्धती लागू असेल. राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार या विषयात ७५% भारांश प्रात्यक्षिकांना आणि २५% भारांश लेखी परीक्षेला देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना वर्षभरात खालील तीन कार्यक्षेत्रांतून प्रत्येकी एक असे एकूण ३ प्रकल्प पूर्ण करणे अनिवार्य असेल
१. सजीव आधारित
२. यंत्र व साहित्य आधारित
३. मानवी सेवा आधारित
याशिवाय उपक्रम पुस्तिका (१५ गुण), प्रात्यक्षिक परीक्षा व तोंडी काम (१० गुण), क्षेत्रभेट किंवा मुलाखत (१० गुण) आणि पोर्टफोलिओ व सत्र सादरीकरण (१० गुण) यांच्या आधारे विद्यार्थ्यांचे गुणांकन केले जाईल.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या धोरणानुसार, इयत्ता ३ री, ४ थी आणि ६ वीच्या कलाशिक्षण विषयात आता दृश्यकला, रंगमंच, संगीत, तसेच नृत्य व हालचाल या चारही कलागटांचा एकत्रित अंतर्भाव करण्यात आला आहे.
प्रात्यक्षिक सादरीकरण: कला शिक्षणामध्ये केवळ कागदावर चित्र काढणे पुरेसे ठरणार नाही. विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष कलाविष्कार, सादरीकरण कौशल्य, लय-ताल, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास तपासून त्यांना गुण व श्रेणी दिली जाईल.
मूल्यमापन साधने: आकारिक मूल्यमापनासाठी जुन्या आठ साधन-तंत्रांपैकी किमान पाच साधने वापरणे बंधकारक असून, त्यामध्ये 'सादरीकरण' आणि 'लेखी चाचणी' यांचा समावेश अनिवार्य करण्यात आला आहे.
आपले सभोवतालचे जग (१ व २): पूर्वीच्या परिसर अभ्यास-१ व २ ऐवजी 'आपले सभोवतालचे जग-१ व २' या विषयांसाठी जुन्या पॅटर्ननुसारच गुण दिले जातील. इयत्ता ३ री व ४ थीसाठी ६०% आकारिक व ४०% संकलित; तर इयत्ता ५ वीसाठी ५०% आकारिक व ५०% संकलित मूल्यमापन राहील.
कार्यशिक्षण:'कार्यानुभव' हा विषय यापुढे इयत्ता ५ वीपर्यंत 'कार्यशिक्षण'नावाने ओळखला जाईल आणि त्यासाठी १००% आकारिक मूल्यमापन लागू असेल.
इतर नियम: अनिवार्य मराठी विषयाची मूल्यमापन पद्धती पूर्ववत राहील. ५ वी आणि ८ वीसाठीची वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षा पद्धती लागू असलेल्या नियमांनुसारच घेतली जाईल.
शिक्षकांनी केवळ वर्षाअखेरीस मूल्यमापन न करता, प्रत्येक प्रकल्पाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून त्यांना सुधारण्यासाठी अभिप्राय (Feedback) द्यावा, असे निर्देश SCERT चे संचालक मंगेश जोशी यांनी दिले आहेत.
विद्यार्थ्यांची संवाद कौशल्ये, नेतृत्वगुण, समस्या निवारण आणि संघकार्य यांसारखी जीवन कौशल्येही चाचण्यांदरम्यान तपासली जाणार आहेत. सध्या पथदर्शी स्वरूपात सुरू असलेल्या समग्र प्रगती पत्रकाबाबत (HPC) भविष्यात स्वतंत्र सूचना जारी केल्या जातील.
नवीन अभ्यासक्रमामध्ये ज्या विषयांच्या नावांमध्ये बदल झालेला नाही, तसेच ज्या विषयांना अद्याप जुना अभ्यासक्रम लागू आहे, त्या विषयांसाठी शासन निर्णय दिनांक २० ऑगस्ट २०१० नुसार विहित केलेली मूल्यमापन पद्धती लागू राहील.
म्हणजेच, केवळ नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे म्हणून सर्व विषयांच्या मूल्यमापन पद्धतीत बदल झालेला आहे, असे समजू नये.
काही विषयांच्या नावांमध्ये बदल करण्यात आले असले, तरी त्या विषयांसाठी पूर्वी निर्धारित केलेली आकारिक आणि संकलित मूल्यमापन पद्धती (Formative and Summative Assessment) लागू राहील.
परिपत्रकात यासाठी ‘परिसर अभ्यास-१ व २’ आणि नवीन अभ्यासक्रमातील ‘आपल्या सभोवतालचे जग-१ व २’ हे उदाहरण दिले आहे. या विषयांसाठी पुढीलप्रमाणे मूल्यमापनाचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे.
त्यामुळे संबंधित इयत्तांमध्ये मूल्यमापन करताना शिक्षकांनी विषयाचे नवीन नाव आणि त्याला लागू असलेली पूर्वीची मूल्यमापन पद्धती या दोन्ही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
इतर माध्यमांच्या शाळांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या अनिवार्य मराठी विषयाची मूल्यमापन प्रक्रिया प्रचलित पद्धतीनुसार सुरू राहणार आहे.
इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वीच्या वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती शासन निर्णय दिनांक ७ डिसेंबर २०२३ नुसार निश्चित केलेल्या तरतुदींप्रमाणे लागू राहतील.
नवीन अभ्यासक्रमातील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे ‘कार्यानुभव’ या विषयाचे नाव बदलून ‘कार्यशिक्षण’ असे करण्यात आले आहे.
परिपत्रकानुसार कार्यशिक्षण हा विषय इयत्ता ५ वीपर्यंत असणार आहे. या विषयासाठी यापूर्वी कार्यानुभव विषयाला लागू असलेली आकारिक मूल्यमापनाची १०० टक्के पद्धत लागू राहील.
याचा अर्थ कार्यशिक्षण विषयाचे मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागाला, कृतीला आणि शिकण्याच्या प्रक्रियेला महत्त्व दिले जाणार आहे. शिक्षकांनी यासाठी संबंधित शासन निर्णयानुसार निर्धारित केलेल्या सूचना लक्षात घेऊन मूल्यमापन करावे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.