Maharashtra HSC SSC Board major changes: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. तब्बल ६१ वर्षांपासून सुरू असलेल्या कार्यपद्धतीत बदल करण्यासाठी राज्य मंडळाने आता मोठी तयारी सुरू केली आहे. परीक्षा पद्धती, प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) बदल करण्यासाठी तीन उच्चस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली. समित्यांच्या शिफारशी आल्यानंतर पुढील तीन ते चार महिन्यांत राज्य मंडळाच्या कामकाजात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
राज्य मंडळाचा सध्याचा कायदा आणि नियम हे १९६५ मधील आहेत. बदलत्या शिक्षण व्यवस्थेनुसार हे नियम कालबाह्य ठरत असल्याने त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि निवृत्त तज्ज्ञांची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे.ही समिती दीड महिन्यात अहवाल सादर करणार असून, त्यानंतर सुधारित मसुदा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
परीक्षेतील गोपनीयता अधिक मजबूत करण्यासाठीही राज्य मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या विभागीय मंडळांकडे असलेली प्रश्नपत्रिका तयार करण्याची आणि सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया थेट पुणे मुख्यालयाकडे आणण्याचा विचार सुरू आहे.
प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकांना आता ‘गोपनीयतेची शपथ’ देणे बंधनकारक करण्याची तयारी सुरू आहे. पेपर तयार करताना नियमांचे पालन होते का, यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही उभारली जाऊ शकते.
प्रात्यक्षिक परीक्षांचे स्वरूप बदलणे, परीक्षांचे वेळापत्रक अधिक नियोजनबद्ध करणे आणि विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी पेपर्सची संख्या मर्यादित ठेवणे, अशा मुद्द्यांवरही समिती अभ्यास करणार आहे. देशातील इतर राज्य मंडळांच्या पद्धतींचाही अभ्यास केला जाणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य मंडळाची कामकाजाची गती वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे. नवीन शैक्षणिक सुधारणा विद्यार्थ्यांपर्यंत जलद पोहोचाव्यात, यासाठी स्वतंत्र समिती सूचना देणार आहे. समित्यांच्या शिफारशी आल्यानंतर राज्य मंडळाच्या परीक्षा आणि प्रशासन व्यवस्थेत मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.