Pune News, 01 Nov : शिक्षक भरतीत संस्था चालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मुलाखतीसह निवड प्रक्रियेत गुणांचे निश्चित सूत्र लागू केले आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हता यासाठी तब्बल ९० गुण निश्चित करण्यात आले आहेत.
तर मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणीसाठी संस्थाचालकांच्या हातात केवळ १० गुण राहणार आहेत. त्यामुळे मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करताना संस्थाचालकांना मनमानी करता येणार नाही. शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ अंतर्गत मुलाखतीसह निवड प्रकारातील नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या उमेदवारांची एकूण २७ हजार १४५ प्राधान्यक्रमांवर शिफारस झाली आहे.
या भरती प्रक्रियेतील पुढील टप्पा ३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. ३ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत उमेदवारांच्या मुलाखती आणि अध्यापन कौशल्य चाचणी पूर्ण करण्याचे निर्देश नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे शिफारस झालेल्या उमेदवारांसाठी आता प्रत्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
संस्थाचालकांच्या हातात केवळ १० गुण
मुलाखतीसह शिक्षक भरती प्रक्रियेत संस्थाचालकांकडून होणारा संभाव्य हस्तक्षेप आणि मनमानी टाळण्यासाठी गुणांचे विभाजन निश्चित करण्यात आले आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुण, संबंधित पदासाठी आवश्यक व्यावसायिक अर्हता आणि शैक्षणिक अर्हता यांना मिळून ९० गुणांचे महत्त्व देण्यात आले आहे. तर मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणीसाठी केवळ १० गुण ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे उमेदवाराचे भवितव्य ठरणार नाही. गुणवत्तेला प्राधान्य देऊन निवड प्रक्रिया राबविण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.
सहावी ते आठवीच्या पदांसाठी सर्वाधिक संधी
जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार सहावी ते आठवी या गटातील पदांसाठी सर्वाधिक उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या गटात ४ हजार ५०५ रिक्त पदांसाठी १० हजार ७२५ उमेदवारांना मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणीसाठी संधी मिळणार आहे. नववी ते दहावीच्या ४ हजार २९४ पदांसाठी ८ हजार २७७ उमेदवारांची, तर पहिली ते पाचवीच्या १ हजार ५२९ पदांसाठी २ हजार ४९४ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
७ नोव्हेंबरपर्यंत तक्रार करण्याची संधी
दरम्यान, पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेतील निवडीसंदर्भात काही तक्रारी असल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य स्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांना विहित नमुन्यातील तक्रारी ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत edupavitra२०२५grcc@gmail.com या ई-मेलवर पाठविता येणार आहेत.
शिफारस झालेल्या उमेदवारांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येत असून, पवित्र पोर्टलवर लॉगिन करून निवडीची स्थिती तपासता येणार आहे. तसेच व्यवस्थापननिहाय गुणवत्ता यादी संकेतस्थळावरील 'डाऊनलोड' पर्यायातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता २५ नोव्हेंबरपर्यंत मुलाखती आणि अध्यापन कौशल्य चाचणी पूर्ण करून प्रत्यक्ष नियुक्ती प्रक्रियेकडे जाण्याचे आव्हान नियुक्ती प्राधिकाऱ्यांसमोर असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.