MVA Sarkarnama
पुणे

Pune Politics: ठाकरेंची सेना अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच; 'या' चार जागांवर आघाडीत पेच

Pune Seat Sharing Issues in MVA : कोथरूड विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे राहणार असून शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे.

Sudesh Mitkar

Pune News: आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये जागावाटप आणि उमेदवारी निश्चितीचं गुऱ्हाळ संपवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र अद्यापही काही जागांबाबत पेच आहे. यामध्ये पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये पुणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

पुणे शहरामध्ये कसबा, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती, वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला आणि कोथरूड असे आठ विधानसभा मतदारसंघ येतात. सध्या या आठपैकी कसबा, कोथरूड, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या चार विधानसभा मतदार संघाच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचं बोललं जात आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे राहणार असून शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. नुकतीच काँग्रेसकडून एक उमेदवार निश्चितीची यादी देखील व्हायरल झाली होती. त्यामध्ये पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांना संधी देण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं होतं.

पूणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा पराभव झाल्यानंतर देखील तिसऱ्यांदा रमेश बागवे यांना संधी देण्याचं काँग्रेसने निश्चित केले असल्याचं बोललं जात आहे. गेल्या निवडणुकीत अवघ्या काही मतांनी पराभव स्वीकाराव्या लागलेल्या दत्ता बहिरट यांना शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेस पुन्हा उतरू इच्छित असल्याचं सध्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणे या यादीमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघातून संजय जगताप आणि भोर विधानसभा मतदारसंघातून संग्राम थोपटे हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे नमूद करण्यात आला आहे.

शहरातील वरील चार विधानसभा मतदारसंघ वगळता हडपसर, वडगाव शेरी, पर्वती आणि खडकवासला या विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी एकमत होताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला खडकवासला,हडपसर, वडगाव शेरी आणि पर्वती मतदारसंघ मिळावा अशी अपेक्षा आहे. तर ठाकरे गट देखील कोथरूड बरोबर आपल्याला हडपसर किंवा खडकवासला विधानसभा मतदारसंघ आपल्याला सोडावा यासाठी आग्रही आहे. यामध्ये तोडगा काढण्यासाठी दरम्यानच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पर्वती विधानसभा मतदारसंघ ठाकरे त्याला सोडण्याची तयारी दर्शवल्याचं बोललं जात होतं.

या विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस देखील आग्रही आहे. पर्वतीमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल हे या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. निवडणुकीची जोरदार तयारी देखील त्यांच्याकडून सुरू आहेत. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघांमधून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या स्वतः लढण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. नेतृत्वाने सांगितल्यास आपण कुठूनही लढू असं सांगून वेळ पडल्यास आपण लढायला तयार असल्याचं सूतोवाच देखील यापूर्वी त्यांनी केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ वेळ पडल्यास ठाकरे गट आपल्याकडे ठेवू इच्छितो.

ठाकरे गटाला पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ देण्याचे निश्चित करण्यात आला आहे. मात्र त्या व्यतिरिक्त दुसरा कोणता तरी एक विधानसभा मतदारसंघ आपल्याला हवा असल्यासने ठाकरे गट आडून बसला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने पर्वती सोडण्या ची ऑफर दिल्यानंतर देखील त्या ऑफर वर ठाकरे समाधानी नसल्याचे देखील समोर आला आहे. त्यामुळे या जागांवर तिढा अद्यापही बाकी असल्याचे पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीतील वरिष्ठ यावर लवकरात लवकर यावर तोडगा काढणार की उमेदवार अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे नाट्य सुरू राहणार हे पाहणे उत्सुकतेच त्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT