Pune News: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दहा दिवस राहिले असल्याने प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र पाहायला मिळत आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सभांचा धुरळा महाराष्ट्रात उडाला आहे.
पुण्यात देखील आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचार करताना दिसणार आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीसाठी खासदार सुप्रिया सुळे देखील पुण्याच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळणार आहे.
पुण्यातील विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आगामी काळामध्ये मोठा प्रमाणात दिग्गज प्रचार करताना दिसणार आहेत. दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली.
यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. भाजप महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी ही सभा असणार आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी अजित पवार मेळावा घेणार आहेत. आज दुपारी बारा वाजता हा मेळावा होणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार सुप्रिया सुळे देखील आज बाईक रॅली, मिळावे आणि प्रचार सभा घेणार आहेत.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आणि कसबा विधानसभा मतदार संघातील प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीनंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघात देखील सुळे यांची बाईक रॅली होणार आहे. त्यानंतर खडकवासला आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात सुळे यांच्या उपस्थितीत मिळावे होतील. आज सायंकाळी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात त्यांची सभा देखील होणार आहे.
आज महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराचा धडाका असला तरी उद्या (शनिवार)मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुण्यात धडाडणार आहे. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोथरूड, कसबा आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात मनसेने उमेदवार दिले आहेत.
या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज ठाकरे उद्या सभा घेणार आहे. तर 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील जाहीर सभा होणार आहे. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ते पुण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस शहरामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.