PM Narendra Modi Latest Marathi News, Ajit Pawar Latest news, devendra Fadnavis Latest News
PM Narendra Modi Latest Marathi News, Ajit Pawar Latest news, devendra Fadnavis Latest News Sarkarnama
पुणे

उपमुख्यमंत्रीच नाही तर आघाडीला डावलण्याचा 'करेक्ट कार्यक्रम' पंतप्रधान कार्यालयानेच केला

उत्तम कुटे

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन कार्यक्रम असलेला कालचा (ता.१४) महाराष्ट्र दौरा वादळी आणि राजकीय वादग्रस्त ठरला. त्याची सुरवात देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानच्या शिळा मंदिर उदघाटनाच्या पहिल्या कार्यक्रमापासून झाली. ती मुंबईरपर्यंत कायम राहिली. देहूत स्थानिक खासदार शिवसेनेचे श्रीरंग बारणे (Shrirang Barne) तसेच राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) हे हजर नसल्याने मोठी चर्चा झाली. त्यात भर पडली ती राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बोलूच न दिल्याने. (MahaVikas Aghadi Latest Marathi News)

एकूणच हा कार्यक्रम संस्थानचा अराजकीय असला तरी तो भाजपने हायजॅक केल्याने तो राजकीय आणि पूर्ण वादाचा ठरला. स्थानिक शिवसेना, राष्ट्रवादीच्या खासदार आमदारांना डावलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना मात्र स्टेजवर बसण्याची संधी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यातून हा कार्यक्रम राजकीय झाला व भाजपने हायजॅक केल्याची चर्चा लगेचच रंगली.

संस्थानचे नितीन महाराज मोरे यांच्याऐवजी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले हेच मिरवताना व पंतप्रधानांच्या पुढे मागे दिसून आले. उपमुख्यमंत्र्यांना डावलून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिल्याने राष्ट्रवादीच्या रडारवर हा सोहळा आला.

उपमुख्यमंत्र्यांना बोलू न देण्याचे खापर भाजपचे स्थानिक माजी आमदार बाळा भेगडे यांनी कालच संस्थानवर फोडले. यामुळे नेमकी व खरी परिस्थिती तसेच संस्थानची बाजू घेण्यासाठी 'सरकारनामा'ने संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांना विचारणा केली असता त्यात धक्कादायक माहिती समजली. हा सोहळा तथा कार्यक्रम संस्थानचा होता तरी त्याचे पूर्ण नियोजन हे अतिसुरक्षेच्या कारणावरून पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) केले होते, असे मोरेमहाराज यांनी सांगितले.

त्यामुळे व्यासपीठावर कोण बसणार आणि कोण बोलणार हे पीएमओतूनच खूप आधी ठरविण्याात आले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भेगडे यांनी संस्थानवर फोडलेले खापर हे अनाठायी असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, खा. बारणे आणि आ. शेळकेच नाही, तर राज्यातील सर्वच पक्षांच्या खासदार, आमदारांना कालच्या कार्यक्रमाला निमंत्रित केले गेले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

देहूच्या सोहळ्यात प्रोटोकॉल पाळण्यात न आल्याने इच्छा असूनही देहूतील सोहळ्याला हजर न राहू शकल्याची खंत खा. बारणेंनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केली. ते व आ. शेळकेंना निमंत्रित न केल्याची चर्चा निष्फळ असून त्यांना निमंत्रण पाठवल्याचे व ते पोचल्याचेही पुरावे भेगडे यांच्या कार्यालयाकडून सरकारनामाला देण्यात आले. मात्र, हजर राहिल्यानंतरही व्यासपीठावर बसण्याची संधी मिळणार नाही, म्हणून राज्यातील सर्वच आमंत्रित खासदार, आमदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचे समजले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT