Pune By-Election | Ravindra Dhangekar
Pune By-Election | Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Pune By-Election : कसब्यातील विजयातून महाविकास आघाडीला गवसला लोकसभेचा उमेदवार !

सरकारनामा ब्युरो

Kasba By-Election : राज्यभर गाजलेल्या कसबा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न भाजपाचे स्थानिक आणि राज्य पातळीवरील नेते प्रयत्न करतील. मात्र, या विजयाने कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

ही निवडणूक महाविकास आघाडी आणि कॉंग्रेस यांच्यापेक्षा आमदार रवींद्र धंगेकर यांच्या वैयक्तिक प्रतिमेवर लढली आणि जिंकलीसुद्धा. धंगेकरांच्या प्रतिमेमुळे भाजपाच्या अनेक प्रयत्नांनंतर पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभव स्वीकारावा लागला.

कसब्याची ही पोटनिवडणूक राज्यातील आजपर्यंतची सर्वात चर्चेची ठरली. महाविकास आघाडी एकसंधपणे लढली तर भारतीय जनता पार्टी एकामागोमाग चुका करीत राहिली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निभावलेली भूमिकादेखील निवडणुकीतील विजयात महत्वाची ठरली. पुण्यात तळ ठोकून त्यांनी कॉंग्रेस अंतर्गत गटबाजीतून मार्ग काढत एकोप्याचा मार्ग दाखवला आणि कधी नव्हे ती कॉंग्रेस एकदिलाने लढली. अर्थात धंगेकरांची प्रतिमा ही कॉंग्रेस आणि आघाडीसाठी निवडणुकीत जमेची बाजू होती.

दुसरीकडे निवडणुकीच्या सुरवातीपासून भारतीय जनता पार्टीकडून चुका होत गेल्या. टिळक कुटुंबाला बाजूला ठेवत हेमंत रासने यांना मिळालेली उमेदवारी त्यातून अंतर्गत झालेले हेवेदावे या साऱ्यातून मेळ घालण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावा लागलेला प्रयत्न यामुळे भाजपाचा निवडणुकीतील सुरवातीचा वेळ वाया गेला.

या साऱ्यातून फडणवीस यांनी मार्ग काढला तरी पारंपरिक मतदारांनी फिरवेली पाठ भाजपाला पराभवाकडे घेऊन गेली. या साऱ्यावर पक्षाकडून आता चिंतन होईल. त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, स्थानिक नेत्यांची मतदारांशी तुटलेली नाळ जोडण्यासाठी पक्ष नेतृत्व काय करणार हा खरा प्रश्‍न आहे.

या निवडणुकीतून महाविकास आघाडीला केवळ एक मतदारसंघ ताब्यात आला इतकेच झालेले नाही. तर पुण्यात खासदारकीचा उमेदवार जिंकू शकतो हा आत्मविश्‍वास येण्यास मदत झाली आहे. महाविकास आघाडी एकसंधपणे लढल्यानंतर जर कसब्यात यश येत असेल तर पुण्यात लोकसभेसाठी का यश वेणार नाही, असा विचार आघाडीने केल्यास त्यांना विजयाचा मार्ग सापडू शकेल.

धंगेकर यांची लोकप्रियता आणि सामान्य कार्यकर्ता ही प्रतिमा त्यांना महाविकास आघाडीचा खासदारकीचा उमेदवार बनवू शकते. पुण्याची जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आलेली आहे. जर कॉंग्रेसकडून आमदार धंगेकर हे उमेदवार म्हणून पुढे आले.

त्यास महाविकास आघाडीने कसब्यातील आताच्या निवडणुकीप्रमाणे साथ दिली तर आमदार धंगेकर पुण्याचे खासदार होऊ शकतात. अर्थात कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते यापुढच्या काळात याकडे कशा पद्धतीने पाहतात आणि विचार करतात त्यावर सारे काही अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT