Manohar Joshi  Sarkarnama
पुणे

Manohar Joshi : पक्षातीलच गद्दारांमुळे पराभव झाल्याचे निडरपणे सांगणारा नेता; म्हणजे मनोहर जोशी सर...

Uttam Kute

Pimpri News : शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे हृदयविकाराने शुक्रवारी (ता. 23) निधन झाले. उद्योगनगरीशी त्यांचे अनेकदा संबंध आले होते. त्यातून उत्तम आणि आदर्श राजकीय नेता म्हणजे राजकारणी कसा असावा, याचे दर्शन घडले होते. त्यातून सर्वसामान्य कार्यकर्त्याला धीर आणि उभारी देणारी त्यांची वृत्ती दिसली होती.

हवेली या राज्यातील त्यावेळच्या सर्वात मोठ्या विधानसभा मतदारसंघाचे 2008च्या पुनर्रचनेत विभाजन होऊन पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तीन विधानसभा मतदारसंघ उद्योगनगरीत अस्तित्वात आले. त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका असलेल्या सुलभा उबाळे यांनी 2009ला भोसरी विधानसभेची निवडणूक शिवसेनेकडून लढवली.

त्यावेळी त्यांचा 1हजार 272 मतांनी निसटता पराभव झाला. विलास लांडे हे भोसरीचे पहिले आमदार म्हणून अपक्ष निवडून आले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंगला कदम या 26 हजार 798 मते घेऊन तिसऱ्या क्रमाकांवर होत्या. त्यावेळी अपक्षांसह एकूण 16 उमेदवार रिंगणात होते.

सुलभा उबाळेंच्या 2009च्या प्रचाराची सुरुवात जोशी सरांनी केली होती, अशी आठवण त्यांचे पती रामभाऊ उबाळे यांनी 'सरकारनामा'ला सांगितली. हे कट्टर आणि आक्रमक शिवसैनिक दाम्पत्य पक्षाच्या फुटीनंतर आजही मूळ शिवसेनेसोबतच आहे. उबाळेंच्या प्रचाराची सुरुवात चिखलीत केली होती. त्यावेळी त्यांनी वेळेचे नियोजन कसे करावे, प्रचार यंत्रणा कशी राबवावी याचे अचूक मार्गदर्शन केले होते.

निकालानंतर पहिला फोन सरांचा आणि मधुकर सरपोतदार साहेबांचा आला. हा पराभव तुमचा नाही, तर पक्षातीलच गद्दारांनी गद्दारी केल्यामुळे झाला असल्याचे त्यावेळी सरांनी सांगितले होते, अशी आठवण उबाळेंनी सांगितली. तसेच खचून न जाता काम करत राहा, असा धीर दिला. मुख्यमंत्रिपद भोगलेला एवढा मोठा नेता हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची किती काळजी घ्यायचा हे त्यातून दिसून आले, असे उबाळे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पिंपरी - चिंचवडचे आराध्य दैवत मोरया गोसावी मंदिराला मनोहर जोशींनी भेट दिली होती. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात त्यांनी मराठी तरुणांना उद्योग, व्यवसायातील अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलाला व्यवसाय करायचा की राजकारणात यायचे आहे, याचे स्वातंत्र्य दिले होते. त्याने बांधकाम व्यवसाय निवडला, असेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते.

मुख्यमंत्री असताना जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी झाली. त्यावेळी त्यांनी मंदिराला भेट दिली. त्यांच्यातील स्थितप्रज्ञ, शांत, संयमी राज्यकर्ता, नेता दिसल्याची आठवण तेथे हजर असलेले पिंपरी - काळेवाडीचे तत्कालीन शिवसेना विभागप्रमुख नंदकुमार सातुर्डेकर यांनी सांगितली.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT