Manoj Jarange Patil Sarkarnama
पुणे

Manoj Jarage Patil : वॅक्स म्युझियममध्ये अवतरले खुद्द जरांगे-पाटील

Maratha Reservation : स्वत:च्याच पुतळ्याचं उद्या लोणावळ्यात मनोज जरांगे-पाटील करणार अनावरण

Uttam Kute

Pimpri News :

मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे-पाटील हजारो मराठा कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज ते पुण्यात आहेत तर उद्या त्यांच्या मुक्काम लोणावळ्यात आहे. यावेळी जरांगे-पाटील यांची लोकप्रियता किती आहे, याची प्रतिची सर्वांना येणार आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात जरांगे-पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) बेमुदत उपोषण सुरू असताना 29 ऑगस्ट 2023 रोजी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले. यानंतर हे आंदोलन खूप गाजलं आणि जरांगे-पाटील प्रकाशझोतात आले. तेव्हापासून प्रत्येक दिवशी जरांगे-पाटलांची लोकप्रियता वाढत आहे. याची दखल घेऊन लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये त्यांचा पुतळा साकारण्यात आला आहे.

जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या पदयात्रेचा उद्या (24 जानेवारी) लोणावळ्यात मुक्काम आहे. यावेळी खुद्द जरांगे-पाटील म्युझियममधील त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. मराठा युवक ऋषीकेश अशोक म्हाळसकर याने जरांगे-पाटील यांचा मेणाचा पुतळा त्याच्या कार्ला, लोणावळा येथील ऋषीकेश वॅक्स म्युझियममध्ये साकारला आहे. त्यासाठी त्याला वडिलांचीही मदत झाली. अगदी जरांगे यांच्यासारखा हुबेहूब त्यांच्या उंचीएवढाच (5 फूट 7 इंच) हा पुतळा बनवण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाच्या लढाईत खारीचा वाटा म्हणून मेणाचा पुतळा केल्याचं ऋषीकेशनं 'सरकारनामा'ला सांगितलं. पुढील पिढीला कळावं, हा उद्देशही त्यामागे आहे, असंही ऋषीकेशनं सांगितलं. दरम्यान, ज्यांचा असा पुतळा बनवायचा असतो, त्यांची त्यासाठी परवानगी लागते. ती जरांगे-पाटील दिल्याचं ऋषीकेशनं स्पष्ट केलं.

ऋषीकेश म्हाळसकर यांचे लोणावळ्यात 10 वर्षांपासून वॅक्स म्युझियम आहे. या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजीमहाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह 30 ते 35 पुतळे आहेत. एक मेणाचा पुतळा तयार करायला सहा महिने लागतात. मात्र,जरांगे-पाटलांचा पुतळा ऋषीकेशनं अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण केला. त्यासाठी पाच किलो मेण लागले. फक्त केस, डोळे असा 20 टक्के भाग बाहेरून आणला, असं ऋषीकेशच्या वडिलांनी सांगितलं. मेणाचा पुतळा बनवताना पैसा, मेहनत आणि प्रचंड वेळ लागतो, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, स्वत: जरांगे-पाटलांनाच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची विनंती केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT