Kolhapur : मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचा लढा अधिकाधिक तीव्र होत चालला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीकडून मराठा समाजाची फौज घेऊन मुंबईकडे कूच केल्यानंतर राज्य सरकारवर प्रचंड दबाव वाढला आहे.
मुंबईमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राज्य सरकारने हालचाली गतिमान केल्या आहेत. आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे जिल्ह्यात आजपासून सर्वेक्षण सुरू केले आहे. सात दिवसांत हे काम पूर्ण करण्याचा फतवा राज्य सरकारने काढला आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी कोल्हापूर शहर व जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी सर्वेक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाला भेट देणार आहेत. या भेटीच्या वेळी सर्व नागरिकांनी घरामध्ये उपस्थित राहून सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याला आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती देण्यात यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या सर्वेक्षणासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक-माध्यमिक शिक्षक, परिचारिका आणि ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांनी आपली दैनंदिन कार्यालयीन कामे करून हे सर्वेक्षण सकाळी किंवा संध्याकाळी करायचे आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनांनुसार महानगरपालिका प्रशासनाने एक नोडल अधिकारी व एक सहायक नोडल अधिकारी, तसेच विभागीय कार्यालयस्तरावर चार नोडल अधिकारी व चार सहायक नोडल अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.
कोल्हापूर महानगरपालिका परिक्षेत्रात 1,370 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण 90 सुपरवायझरची नियुक्ती केली आहे, तर संपूर्ण जिल्ह्यात 6,044 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यासाठी 401 सुपरवायझरची नेमणूक केली आहे.
Edited By : Rashmi Mane
R...