Manoj Jarange, Prasad Lad Sarkarnama
पुणे

Prasad Lad News : मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाला बसले; भाजपचे प्रसाद लाड म्हणतात, मी अंतरवाली सराटी गाठल्याशिवाय तोडगा निघणार नाही...

Manoj Jarange protest News : पुण्यात सोमवारी भाजपची राज्यस्तरीय बैठक पार पडत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील बडे भाजपचे नेते उपस्थित आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत जरांगे यांच्या मागण्यांवर संविधानिक मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल, असे लाड यांनी सांगितले.

पुण्यात सोमवारी भाजपची राज्यस्तरीय बैठक पार पडत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील बडे भाजपचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीदरम्यान मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना लाड म्हणाले, "जरांगे पुन्हा आंदोलनाला बसले आहेत. तिकडे गेल्याशिवाय तोडगा निघणार नाही."

जरांगे यांनी उपस्थित केलेले मुद्दे सरकारच्या पातळीवर चर्चेत आले आहेत. मात्र, त्यावर अद्याप अपेक्षित तोडगा निघालेला नाही. जरांगे यांच्या मागण्यांचा सरकार पूर्ण विचार करेल. संविधानिक मार्गाने त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल," असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सरकारमधील काही अधिकारी निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण करत असल्याचा आरोपही प्रसाद लाड यांनी केला. "मी हे मागेही बोललो आहे. काही अधिकारी झारीतल्या शुक्राचार्यांमुळे त्रास होत आहे. हा त्रास कसा कमी होईल, यासाठी समितीचे प्रमुख म्हणून विखे पाटील काम करत आहेत. मला निश्चितपणे वाटतं की यावर तोडगा निघेल," असे लाड म्हणाले.

'झारीतले शुक्राचार्य' कोण?

"काही अधिकारी वर्ग हे झारीतल्या शुक्राचार्यांचे काम करत आहेत," असा थेट आरोप करत लाड यांनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे जरांगे यांच्या मागण्यांवर तोडगा काढताना नेमका अडथळा कुठे आहे, याची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे.

लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावरही भाष्य

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबतही प्रसाद लाड यांनी भूमिका मांडली. "मोर्चा काढणं हा सगळ्यांचा अधिकार आहे. मला असं वाटतं की ते मुंबईला न येता उपोषणाला बसले आहेत. आमचं एक शिष्टमंडळ त्यांच्यासोबत चर्चा करत आहे," असे त्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT