NCP and BJP
NCP and BJP  Sarkarnama
पुणे

Chinchwad पोटनिवडणुक लढण्यासाठी आक्रमक झालेल्या नानांना दादांसह राष्ट्रवादीचा होकार मिळणार का?

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेल्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबातील उमेदवार असेल, तर ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी काल (ता.२१) मांडली.

तिला या मतदारसंघातून इच्छूक असल्याचे जाहीर करीत सोशल मीडियातून प्रचारही सुरु केलेले राष्ट्रवादीचे पिंपरी पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांनी विरोध करीत आपल्याच या आमदारांवर भाजपच्या नथीतून आज (ता.२२) तीर मारला. त्यामुळे त्याची चर्चा सुरु झाली आहे.

ही पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही, पंढरपूरच्या पराभवाचा वचपा काढणारच, असा निर्धार काटे यांनी बोलून दाखवला. यापूर्वी राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांत कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म, त्यावेळी भाजपला राजकीय परंपरा दिसली नाही का, त्यावेळी माणुसकी कुठे गेली होती, असा रोकडा सवाल त्यांनी भाजपला विचारत आ.बनसोडेंवर शरसंधान केले.

सर्व ताकदिनीशी ही निवडणूक लढणारच, असा निर्धार त्यांनी पुन्हा बोलून दाखवला. भाजप हा अत्यंत संकुचित, मतलबी, जातीयवादी, स्वार्थी राजकीय पक्ष असून त्यांची विचारधारा आम्हाला मान्य नाही. त्यामुळे बिनविरोध विसरा, आता पंढरपूरचा बदला घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सैन्य सज्ज आहे, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

दोन दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक घड्याळ या पक्षचिन्हावर लढण्याचा ठराव केला आहे. त्यातून भाजपला बाय देण्याचा त्यांचा मनोदय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फक्त आता यावर राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींची भूमिका काय राहते, याकडे चिंचवडच नाही, तर संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

या पोटनिवडणुकीच्या निकालाचे पडसाद थेट आगामी पिंपरी महापालिका निवडणुकीवर पडणार असल्याने ती कुठल्याही परिस्थितीत लढविण्य़ाचा चंग शहर राष्ट्रवादीने (NCP) बांधलेला आहे. जर, त्यात विजय मिळाला, तर भाजपविरोधात नकारात्मक संदेश जाऊन महापालिकेत पुन्हा सत्तेत येण्याचे राष्ट्रवादीचे दारही किलकिले होणार आहे.

पवारसाहेबांनी दिलेल्या संस्कारामुळेच आ.बनसोडेंनी व्यक्त केलेल्या भावनेचा आदर आहे, असे सांगतानाच पंढरपूरला वेगळा न्याय आणि चिंचवडला वेगळा न्याय असे होत नाही, असे स्पष्ट करीत काटेंनी बनसोडेंच्या मताशी असहमती दर्शवली. पण, २०१७ ला राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करून पालिकेत भाजप सत्तेत आले. तो पराभव विसरता येणार नाही, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.

पालिकेत भ्रष्टाचाराचे थैमान घालणाऱ्या भाजपला आम्ही मोकाट सोडणार नाही. त्यासाठी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. पालिकेतील पराभवाचा बदला घेतल्याशिवाय तो आता शांत बसणार नाही. आता फक्त लढायचे आणि जिंकायचे हेच ध्येय आमच्यापुढे आहे, असा निर्धार व्यक्त करतानाच दुसरीकडे मात्र, पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू, असेही काटे यांनी प्रसिद्धीपत्रकात शेवटी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT