तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे येथील मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती संभाजी आनंदराव शिंदे व उपसभापती नामदेव शेलार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दोघांनीही राजीनामा दिल्याने आता बाजार समितीत नेतृत्व बदलाची चर्चा रंगू लागली आहे. दोन्ही प्रमुख पदे रिक्त झाल्यामुळे लवकरच नव्या पदाधिकाऱ्यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मे २०२३ मध्ये मावळ बाजार समितीची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधील १७ तर भाजपच्या पॅनेलमधील १ असे एकूण १८ संचालक निवडून आले होते. त्यानंतर २४ मे २०२३ रोजी सभापतीपदी संभाजी शिंदे आणि उपसभापतीपदी नामदेव शेलार यांची निवड झाली होती. सर्व संचालकांना संधी मिळावी या भूमिकेतून पदांची मुदत काही कालावधीसाठी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींचा परिणाम स्थानिक राजकारणावरही झाला आणि अखेर दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिले.
सभापती म्हणून शिंदे व उपसभापती म्हणून नामदेव शेलार या दोघांसह सर्व संचालक यांचे योगदान महत्त्वाचे आहे. सभापती व उपसभापती यांच्या कार्यकाळात समितीच्या विकासासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. १९५७ मध्ये स्थापन झालेल्या बाजार समितीचा कारभार काही काळ दुर्लक्षित झाल्याची टीका होत असताना यांनी कार्यालयीन व्यवस्था सुधारण्याबरोबरच बाजार समितीची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
समितीचे सुसज्ज कार्यालय उभारणे, सुमारे सहा एकर क्षेत्रात कंपाउंड व सुशोभीकरणाची कामे, तसेच बाजार समितीच्या विकासासाठी सुमारे २२ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करून घेणे अशी महत्त्वाची कामे त्यांच्या कार्यकाळात झाली. तिवणे आणि तळेघर परिसरात उपबाजार सुरू करण्याच्या दिशेनेही प्रयत्न करण्यात आले असून उद्योग उपबाजार सुरू करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. या कामात बाजार समितीचे सचिव मंगेश घारे यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.
या सर्व कामांमध्ये स्व. अजित पवार तसेच सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन लाभल्याचेही सांगितले जाते. संचालक मंडळाच्या सहकार्याने बाजार समितीचा कारभार गतिमान करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील योगदान निश्चितच उल्लेखनीय मानले जात आहे. दोन्ही पदांचे राजीनामे दिल्यामुळे आता मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या नेतृत्वाची निवड होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.