Ashwini Jagtap, Shankar Jagtap Sarkarnama
पुणे

Maval Election result 2024 : चिंचवडवर जगताप कुटूंबाचा होल्ड कायम, बारणेंना दिले सर्वाधिक पाऊण लाखांचे लीड !

Uttam Kute

Pimpri News : मावळ लोकसभेतून निवडणूक लढवित हॅटट्रिक करीत शिंदे शिवसेनेचे श्रीरंग बारणे 96 हजार 615 मतांच्या लीडने विजयी झाले. त्यांच्या या विजयात घाटावरील भाजपचे आमदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा राहिला. त्यामुळेच पुन्हा एकदा मावळचा खासदार हा घाटावरचा झाला.त्याजोडीने महायुतीतील राष्ट्रवादीच्या दोन आमदारांच्या मतदारसंघांनीही बारणेंच्या विजयाला हातभार लावला.

दरम्यान, मावळमध्ये सर्वात मोठ्या,तर राज्यात मतदारसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघावरील जगताप कुटुंबाचा होल्ड तथा करिष्मा कायमच राहिला नाही,तर तो वाढला असल्याचे लोकसभेच्या मावळच्या निकालातून स्पष्ट झाले.कारण चिंचवडने बारणेंना सर्वाधिक पाऊण लाखाचे (74 हजार 765) मताधिक्य देऊन आपला सिंहाचा वाटा उचलला.त्यातून जगतापांची आगामी विधानसभेला चिंचवडवरील दावेदारी आणखी घट्ट झाली.

चिंचवड मतदारसंघाचे पहिल्यापासूनचे आमदार पिंपळेगुरव येथील जगताप कुटुंबातीलच सदस्य आहे. 2009 ला चिंचवड अस्तित्वात आला तेव्हा लक्ष्मण जगताप पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले.त्यानंतर 2014 आणि 2019 ला ते पुन्हा आमदार झाले. 3 जानेवारी 2023 रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी या 26 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. त्यांचे दीर शंकर जगताप हे भाजपचे (BJP) पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष आहेत. त्यांचाही बारणेंच्या यशात वाटा आहे. बारणेंना सर्वाधिक लीड देऊन चिंचवडमधून शंकर जगतापांनी आगामी विधानसभेची आपलीही चिंचवडवरील दावेदारी बळकट केल्याची चर्चा ऐकायला मिळाली. कारण ते गेल्यावर्षीच्या चिंचवडच्या पोटनिवडणुकीतच इच्छूक होते.

पुणे आणि घाटाखालील रायगड (Raigad) जिल्ह्यात निम्मा-निम्मा विभागल्या गेलेल्या मावळचे पहिले खासदार गजानन बाबर घाटावरचे पिंपरी-चिंचवडकर होते. त्यानंतर 2014, 2019 आणि आता 2024 ला पुन्हा घाटावरचेच उद्योगनगरीचेच श्रीरंग बारणे हे खासदार मावळचे खासदार झाले.त्यांच्या विजयात भाजपच्या आमदार अश्विनी जगतापांच्या चिंचवडचा सिंहाचा वाटा राहिला. बारणेंच्या 96 हजार 615 मध्ये चिंचवडनचा हिस्सा हा तब्बल पाऊण लाखाचा राहिला आहे. गेल्यावर्षी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप या 37 हजाराच्या लीडने निवडून आल्या होत्या. मात्र,यावेळी लोकसभेला चिंचवडमधून बारणेंना त्याच्या दुप्पट मताधिक्य दिले.

फक्त कर्जतमध्ये बारणेंना 17 हजार 607 मतांची पिछाडी मिळाली.बाकीच्या पाच विधानसभा मतदारसंघात ते आघाडीवर राहिले.घाटावरील तिन्ही विधानसभेत त्यांना आघाडी मिळाली. चिंचवडनंतर पिंपरीने त्यांना 16 हजार 737 चे लीड दिले. तेथे अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आहेत.तर,याच पक्षाचे आमदार सुनील शेळकेंच्या मावळमध्ये बारणे यांना 4 हजार 935 चे मताधिक्य भेटले. तर,त्यांना भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पनवेलने 31 हजार 38 चे लीड दिले. ते उरण या घाटाखालील तिसऱ्या मतदारसंघात 13 हजार 250 राहिले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT