तळेगाव दाभाडे (पुणे): विविध निवडणुका, बंदोबस्त, मोर्चे, आंदोलने, सण-उत्सव, मंत्र्यांचे दौरे, वाहतूक कोंडीसह विविध जबाबदाऱ्या पार पाडताना चोवीस तासांहून अधिक काळ कर्तव्य बजावणाऱ्या मावळ तालुक्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न अद्याप कायम आहे.
उन्हाळा असो अथवा पावसाळा, खाकी वर्दीतील कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मात्र अनेक वर्षांपासून शासकीय निवासाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत असून, मूलभूत सुविधांसाठीही त्यांची गैरसोय होत आहे.
मावळ तालुक्यातील वडगाव, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, कामशेत, लोणावळा ग्रामीण आणि लोणावळा शहर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुमारे सातशे पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत.
या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी पुरेशी शासकीय घरे उपलब्ध नसल्याने अनेकांना कर्तव्याच्या ठिकाणापासून दूर भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. त्यामुळे कामाच्या वेळा, वाहतूक आणि कुटुंबीयांच्या दैनंदिन गरजांचा ताण वाढत आहे.
वडगाव हे मावळ तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असल्याने येथे पोलिसांवर कामाचा मोठा ताण असतो. मात्र, गेल्या सुमारे तीस वर्षांपासून पोलिस कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा शासकीय निवासाची सुविधा उपलब्ध नाही. ब्रिटिशकालीन आठ खोल्यांची जुनी चाळ होती.
प्रशासकीय नवीन इमारतीचे काम सुरू करण्यापूर्वी ती पाडण्यात आली. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांचीही कमतरता असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.
तळेगाव दाभाडे आणि तळेगाव एमआयडीसी ही दोन्ही पोलिस ठाणी पूर्वी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीत होती. आता ती पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आहेत. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याची इमारत सुसज्ज असली, तरी पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था नाही.
या पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग, चाकण मार्ग तसेच उर्से औद्योगिक परिसर येतो. त्यामुळे वाहतूक, अपघात, औद्योगिक सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या कामाचा पोलिसांवर मोठा ताण असतो.
तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याची इमारत सुमारे सहा वर्षांपूर्वी नव्याने उभारण्यात आली. मात्र, येथेही पोलिस कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासाची व्यवस्था झालेली नाही. औद्योगिक परिसरातील मोठ्या कंपन्या, कामगारांचे प्रश्न आणि कायदा-सुव्यवस्थेच्या जबाबदाऱ्यांमुळे कर्मचाऱ्यांना सातत्याने धावपळ करावी लागते. निवासाची सोय नसल्याने काही कर्मचाऱ्यांना दूरवरून कर्तव्यावर यावे लागते.
लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत पवना धरण, विविध किल्ले तसेच एकवीरा देवी मंदिर यांसारखी महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या गर्दीच्या काळात पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण मोठ्या प्रमाणात वाढतो.
पोलिस ठाण्याची नवीन इमारत उभारण्यात आली असली, तरी कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी अद्याप ब्रिटिशकालीन आठ खोल्यांची जुनी चाळ वापरली जाते. ही चाळ आता मोडकळीस आली असून, तेथे राहणे कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.
लोणावळा शहर हे राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक नियंत्रण, बंदोबस्त आणि कायदा-सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. पोलिस ठाण्याची सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे; मात्र कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न कायम आहे.
खंडाळा येथे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ५२ सदनिका उपलब्ध आहेत. त्यापैकी काही इमारतींच्या भिंतींना तडे गेले असून, पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरत असल्याची स्थिती आहे.विशेष म्हणजे लोणावळा शहर पोलिस ठाणे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळाले असतानाही पोलिस कर्मचाऱ्यांना मात्र सुरक्षित आणि सुविधायुक्त निवासासाठी वणवण करावी लागत आहे.
मावळ तालुक्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र, हे प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय पातळीवरच प्रलंबित असल्याची पोलिस कर्मचाऱ्यांची नाराजी आहे. पुणे ते मुंबई असा प्रस्तावांचा प्रवास कधी संपणार आणि पोलिसांच्या निवासाचा प्रश्न कधी मार्गी लागणार, असा सवाल कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
कामशेत पोलीस ठाणे हे तिन्ही मावळाचे केंद्र बिंदू असून या हद्दीत 191 गावे आहेत धरणे,द्रुतगती मार्गासह अनेक पर्यटन स्थळे आहेत. अवघ्या अर्धा गुंठ्यात पोलीस ठाणे असून बसायला जागा अपुरीपडत आहे. गेल्या पाच वर्षांपासून नविन इमारतीची प्रस्ताव कागदावरच फिरत आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांसाठी नविन घरांचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी शासन स्तरावर पाठविण्यात आला आहे, मात्र अध्याप प्रस्तावा बाबत काही आले नाही.
गजानन टोम्पे (लोणावळा विभाग विभागीय पोलीस अधिकारी)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.