Maval Rain Damage Farmers Compensation sarkarnama
पुणे

Maval News: जबाबदारीवरुन महसूल-कृषी विभागात धुसफूस; मावळात पंचनामे रखडले, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Maval Rain Damage Farmers Compensation:मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातखाचरे पाण्याखाली गेली असून पिकांचेही नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचे आणि गोठ्यांचेही नुकसान झाले आहे.

सरकारनामा ब्यूरो

विजय सुराणा

  • मावळमध्ये अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान

  • महसूल आणि कृषी विभागातील समन्वयाअभावी पंचनाम्यांना विलंब

  • प्रशासनाचा दावा; पंचनाम्यांना गती देण्याचे आदेश, चालढकल करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा.

तळेगाव दाभाडे: मावळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती, घरे तसेच पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असतानाही पंचनाम्यांचे काम अपेक्षित वेगाने होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासनाकडून आदेश देण्यात आले असले तरी महसूल आणि कृषी विभागातील समन्वयाअभावी पंचनाम्यांची प्रक्रिया रखडल्याची चर्चा सुरू आहे.

मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातखाचरे पाण्याखाली गेली असून पिकांचेही नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचे आणि गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झाले नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

'एसआरआर'च्या कामामुळे अधिकारी व्यस्त

कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामविकास विभागातील अधिकारी सध्या 'एसआरआर' (Special Intensive Revision) संबंधित कामात मोठ्या प्रमाणात गुंतले आहेत. त्यामुळे संयुक्त पंचनाम्यांना अपेक्षित गती मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे.

संयुक्त पंचनाम्यांचे आदेश

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाने संयुक्तपणे करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र अनेक गावांमध्ये या प्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नाही. संबंधित विभागांकडून जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याचीही चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

प्रशासनाचे स्पष्टीकरण

याबाबत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले की, पावसामुळे घरांचे, शेतीचे आणि इतर मालमत्तेचे संयुक्त पंचनामे सुरू असून एसआरआरची कामेही सुरू आहेत. आवश्यक तेथे अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कामात कोणीही चालढकल केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, कृषी अधिकारी मारुती साठे यांनीही शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाकडे सादर करण्यात आला असून सोमवारपासून संयुक्त पंचनाम्यांना अधिक वेग देण्यात येणार असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांची मागणी

पावसामुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसानभरपाई लवकर जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. पंचनाम्यांतील विलंबामुळे आर्थिक संकट अधिक तीव्र होत असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT