

Mumbai: मुंबईतील वाढती वाहतूककोंडी आता सर्वसामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींसाठीही डोकेदुखी ठरत आहे. पश्चिम उपनगरातील दहिसर येथे वास्तव्यास असलेले मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात अधिकृत निवासस्थान उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी भायखळ्यातील राणीबाग परिसरातील रिक्त शासकीय बंगला देण्याची विनंती करत मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवले आहे.
उपमहापौर पदाच्या जबाबदाऱ्यांमुळे दररोज महापालिका मुख्यालयात विविध बैठका, सभागृहाचे कामकाज, नागरिकांच्या तक्रारींची दखल, विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय तसेच शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते. मात्र, दहिसर ते दक्षिण मुंबई हा प्रवास वाहतूककोंडीमुळे अत्यंत वेळखाऊ ठरत असून अनेकदा नियोजित वेळेत पोहोचणेही शक्य होत नाही, अशी खत घाडी यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
शहरात अधिकृत निवासस्थान उपलब्ध झाल्यास प्रवासाचा वेळ वाचेल आणि नागरिकांची कामे अधिक कार्यक्षमतेने व तत्परतेने करता येतील. त्यामुळे भायखळ्यातील राणीबाग परिसरात अतिरिक्त आयुक्तांसाठी राखीव असलेला आणि सध्या रिक्त असलेला बंगला उपमहापौरांच्या निवासासाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राणी बागेतील रिक्त बंगला घाडी यांना पाहिजे असल्याची माहिती आहे. या बंगल्यासाठी केवळ उपमहापौरांचाच दावा नसल्याची माहिती महापालिका वर्तुळातून समोर येत आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीनंतर प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी त्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सध्या त्या मलबार हिल येथील केंद्र सरकारच्या निवासस्थानी राहत असून ते निवासस्थान लवकरच रिकामे करावे लागणार आहे.
राज्य सरकारकडून आयएएस अधिकाऱ्यांसाठी पर्यायी निवासाची व्यवस्था होण्याची शक्यता असली तरी, राणीबागेतील हा बंगला मिळावा यासाठी त्या अर्ज करू शकतात, अशी चर्चा आहे. तसे झाल्यास त्यांच्या दाव्यालाही प्रशासकीय स्तरावर महत्त्व प्राप्त होऊ शकते.
याशिवाय महापालिकेतील आणखी एका अतिरिक्त आयुक्ताकडूनही या बंगल्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या शासकीय निवासस्थानावर एकापेक्षा अधिक दावेदार असल्याने अंतिम निर्णयाकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या निमित्ताने मुंबईतील वाढत्या वाहतूककोंडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपनगरातून दक्षिण मुंबईतील महापालिका मुख्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी दररोज मोठा वेळ खर्ची पडत असल्याने केवळ नागरिकच नव्हे, तर प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनाही त्याचा फटका बसत असल्याचे या मागणीमुळे अधोरेखित झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.