Maval APMC Election news Sarkarnama
पुणे

Maval APMC Election: नवा पायंडा! सभापती-उपसभापतीपद दोन महिन्यासाठी! मावळमध्ये 'लॉटरी'ने होणार निवड

Maval APMC Election Chairman, Vice Chairman Selected by Lottery: मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. जाणून घ्या संपूर्ण निवडणूक घडामोडी.

सरकारनामा ब्यूरो

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे (पुणे): मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत यंदा वेगळाच पायंडा पडला आहे. उर्वरित कमी कार्यकाळात सर्व इच्छुक सदस्यांना संधी मिळावी, यासाठी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी दोन महिन्यांचा कालावधी निश्चित करून लॉटरी पद्धतीने निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या बुधवारी (दि. २५) वडगाव मावळ येथे ही निवडणूक होणार आहे. समितीचा केवळ दोन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असल्याने सभापती व उपसभापती पदासाठी इच्छुकांमध्ये कालावधी वाटून घेण्याचे ठरले. सभापतीपदासाठी ९ तर उपसभापतीपदासाठी ४ इच्छुक असल्याने सर्वांना समान संधी देण्यासाठी चिठ्ठी पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

माजी सभापती संभाजी शिंदे व उपसभापती नामदेव शेलार यांच्या राजीनाम्यांमुळे ही पदे रिक्त झाली आहेत. सुरुवातीला सर्व सदस्यांना पदाची संधी देण्याचे ठरले होते; मात्र राजीनामे वेळेत न आल्याने तीन वर्षांचा कालावधी निघून गेला. त्यामुळे उर्वरित कालावधी सर्व इच्छुकांमध्ये विभागून घेण्याचा मार्ग निवडण्यात आला आहे.

“कोण आधी आणि कोण नंतर” या मुद्द्यावर वाद टाळण्यासाठी थेट लॉटरीद्वारे निवड करण्याचे ठरविण्यात आले. या निर्णयामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असून संभाव्य संघर्ष टळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,बबनराव भेगडे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, पंचायत समितीचे उपसभापती साहेबराव कारके यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पाडण्याचा निर्धार सदस्यांनी व्यक्त केला आहे. दर दोन महिन्यांनी सभापती व उपसभापती बदलणार असल्याने सर्व इच्छुकांना पदाची संधी मिळणार आहे. त्यामुळे बुधवारी निघणाऱ्या पहिल्या लॉटरीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

मे २०२३ मध्ये मावळ बाजार समितीची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधील १७ तर भाजपच्या पॅनेलमधील १ असे एकूण १८ संचालक निवडून आले होते. त्यानंतर २४ मे २०२३ रोजी सभापतीपदी संभाजी शिंदे आणि उपसभापतीपदी नामदेव शेलार यांची निवड झाली होती.

सर्व संचालकांना संधी मिळावी या भूमिकेतून पदांची मुदत काही कालावधीसाठी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींचा परिणाम स्थानिक राजकारणावरही झाला आणि अखेर दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT