Murlidhar Mohol
Murlidhar Mohol Sarkarnama
पुणे

महापौर मोहोळ पटोलेंना म्हणाले; राजीनामा द्या आणि येरवड्यातील मनोरुग्णालयात दाखल व्हा !

सरकारनामा ब्यूरो

पुणे : जबाबदार पदावर काम करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Potale) बेताल वक्तव्ये करीत आहेत.त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन येरवड्यातील मनोरुग्णालयात दाखल व्हायला हवे, कारण त्यांची बौद्धिक कुवत आणि मानसिक स्थिती पाहता, हेच योग्य आहे, अशा तिखट शब्दात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फटकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी महापौर मोहोळ यांनी ट्विट करत पटोले यांना लक्ष्य केले.

भंडारा येथे नागरिकांशी बोलताना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यावर भाजपाकडून पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असून राज्यभर पटोले यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे. या पाश्‍र्वभूमीवर महापौर मोहोळ यांनीही ट्विट करत पटोले यांचा समाचार घेतला.

पटोले यांनी राजीनामा द्यावा आणि येरवड्यातील मनोरुग्णालयात दाखल व्हावे, असा बोचरा वार करत महापौर मोहोळ म्हणाले, ' नावापुरता का होईना, पण 'राष्ट्रीय' पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय बोलावे?, याचे काडीचेही भान असू नये? नाना पटोले हे जबाबदार व्यक्ती नसतीलही, मात्र त्यांच्याकडे असलेले पद हे जबाबदारीचे आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा'.

'नाना पटोले यांच्या मुक्ताफळांचा केवळ भारतीय जनता पक्षाकडूनच नाही, तर सामान्य नागरिकांकडूनही निषेध व्यक्त केला जात आहे. सामान्य नागरिकांच्या मनातही पटोले यांच्या वक्तव्याबद्दल रोष आहे. त्यामुळे पटोले यांची बौद्धिक क्षमता आणि मानसिकता स्थिती तातडीने तपासणे आवश्यक आहे', असेही महापौर मोहोळ यांनी म्हटले आहे.

'खरे तर घडलेल्या प्रकाराबद्दल नाना पटोले यांनी माफी मागायला हवी होती. मात्र तसे होताना दिसत नाही. उलट चुकीच्या वक्तव्याचे समर्थन कसे करु नये, याचे उदाहरण पटोले दाखवून देत आहेत. त्यामुळे पटोले यांचे आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांनतर चुकीच्या पद्धतीने केलेले समर्थन, याचा विचार करता, पटोले यांची जागा प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीपेक्षा मनोरुग्णालयात अधिक योग्य आहे', असेही महापौर मोहोळ म्हणाले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT