DCM Ajit Pawar Sarkarnama
पुणे

DCM Ajit Pawar: दादांनी वेळ दिल्याने सहा हजार नागरिकांचं स्वप्न पूर्ण होणार; 'म्हाडा'च्या लाॅटरीला अखेर मुहूर्त

Mhada Lottery 2023 Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ मिळत नसल्याने म्हाडा घरांच्या लाॅटरीची सोडत पुढे ढकलण्यात आली होती.

Ganesh Thombare

चैतन्य मचाले :

Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ जुळत नसल्याने दोन वेळा लांबणीवर पडलेल्या म्हाडा घरांच्या लाॅटरीला मुहूर्त अखेर मिळाला आहे. मंगळवारी (5 डिसेंबरला) ही लाॅटरी काढली जाणार असून, पावणेसहा हजार नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न यामुळे पूर्ण होणार आहे. तीन महिन्यांनंतर ही सोडत काढली जाणार आहे.

नागरिकांना परवडतील अशा दरात घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी म्हाडाच्या वतीने लाॅटरी काढून घरे उपलब्ध करून दिली जातात. काही वर्षांपूर्वी म्हाडा स्वतःच आपल्या मालकीच्या जमिनीवर गरीब, गरजू नागरिकांसाठी घरे बांधून त्यांची विक्री करत होते. मुकुंदनगर, येरवडा, पाषाण परिसरात म्हाडाने इमारती बांधून त्याची विक्री केलेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्वतःची घरे बांधून ती लाॅटरी काढून विकायची, असे धोरण म्हाडाचे असल्याने मध्यंतरीच्या काळात म्हाडाच्या मालकीच्या जागाच उपलब्ध होत नसल्याने म्हाडाच्या वतीने काढल्या जाणाऱ्या लाॅटरीची संख्या घटली होती. परिणामी अनेकांना कमी दरात हक्काची घरे मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यानंतर म्हाडाने आपल्या पॅालिसीमध्ये बदल करत पंतप्रधान आवास योजना, 20 टक्के सर्वसमावेशक घरे, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली.

म्हाडाच्या पुणे (Pune) मंडळाच्या माध्यमातून तीन महिन्यांपूर्वी म्हाडाच्या पाच हजार 863 घरांच्या सोडतीची जाहिरात काढली होती. नागरिकांकडून अर्ज मागवून एका महिन्यामध्ये याची लाॅटरी काढून संबधित भाग्यवान नागरिकांना घरे देण्याची घोषणा करण्यात आली होती. या घरांसाठी 5 सप्टेंबरपासून अर्जांची विक्री-स्वीकृती याला सुरुवात झाली होती. या लाॅटरीला सुरुवातीच्या काळात आवश्यक असलेला प्रतिसाद न मिळाल्याने अर्ज विक्रीला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. अखेरच्या मुदतीत 60 हजार अर्ज दाखल झाले. त्यातील पाच हजार 863 जण अर्जासाठी पात्र ठरले.

या घरांची लाॅटरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार यांच्या हस्ते काढण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार शिंदे, फडणवीस यांची वेळ घेण्यात आली होती. मात्र, उपमुख्यमंत्री पवार यांची वेळ मिळत नसल्याने ही सोडत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर दिवाळीच्या नंतर ही प्रक्रिया पार पाडली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्याच काळात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार डेंगीने आजारी असल्याने प्रशासकीय कारण पुढे करत घरांची सोडत पुढे ढकलण्यात आली.

उपमुख्यमंत्री पवार यांची वेळ मिळत नसल्याने ही सोडत पुढे ढकलली जात असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. याच काळात घरांची सोडत कधी काढली जाईल, याची विचारणा करण्यासाठी म्हाडाच्या कार्यालयात गेलेल्या अर्जदारांना कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून बेजबाबदारपणाची वागणूक दिली जात असल्याने हे घरही नको, अशी भावना अर्जदारांकडून व्यक्त केली जात होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची वेळ मिळाल्याने आता म्हाडाच्या लॅाटरीला मुहूर्त मिळाला आहे. नवीन पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात ही सोडत होणार असून, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे या वेळी उपस्थित राहणार आहेत.

(Edited by- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT