Shirur Gram Panchayat Election  Sarkarnama
पुणे

सर्व यंत्रणा कामाला लावली, छुपी ताकदही पुरवली मात्र दादा पाटील फराटे सर्वांना पुरुन उरले....!

Pune Gram Panachayat : सरपंचपदासह १७ पैकी ११ जागा जिंकून घड्याळाची टिकटिक बंद पाडली.

सरकारनामा ब्यूरो

शिरूर : शिरूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संमिश्र निकाल आले आहेत. मांडवगण या मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद भाजपकडे गेले असून, सोनेसांगवी व काठापूर येथे अनुक्रमे बाळासाहेबांची शिवसेना व राष्ट्रवादीचे सरपंच झाले. करंजावणे च्या सरपंचपदी अपक्षाची वर्णी लागली असून, सदस्यपदांच्या निवडीत मात्र राष्ट्रवादीने आघाडी घेतली.

शिरूर (Shirur) तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मांडवगण फराटा सह करंजावणे तसेच आंबेगाव मतदार संघाला जोडलेल्या सोनेसांगवी व काठापूर खुर्द या ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणूकीत सर्वच ठिकाणी मोठी चुरस दिसून आली. नुकत्याच झालेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निकालात घवघवीत यश मिळविलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने मोठे उत्साहाचे वातावरण होते, तर भारतीय जनता पक्षासह इतर पक्षांचा काहीसा सावध पवित्रा दिसून आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहुतांश ग्रामपंचायत सदस्य पदांवर हक्क सांगितला असला, तरी केवळ काठापूर या एकाच गावच्या सरपंचपदावर त्यांना समाधान मानावे लागले आहे.

मांडवगण फराटा या तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद राखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने तडाखेबंद यंत्रणा लावली होती. राष्ट्रवादीच्या, तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची छुपी ताकदही या पॅनेलच्या पाठिशी एकवटली होती.'घोडगंगा'च्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलमधून एकमेव निवडून आलेले संचालक व भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी आपल्या सुनबाई समिक्षा अक्षय फराटे यांना थेट सरपंचपदाच्या रिंगणात उतरविले होते. तर राष्ट्रवादीने शितल सचिन जगताप यांना उमेदवारी देऊन प्रचारपातळीवरही काहीशी आघाडी घेतली होती.

राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मांडवगण मध्ये युती करून राष्ट्रवादीसमोर उभे ठाकले होते. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हासंघटक सुधीर फराटे यांनी घोडगंगा च्या निवडणुकीतील पराभवातून सावरताना अचूक यंत्रणा उभी केली. तडाखेबंद पण संयमी प्रचाराचा फारसा बोभाटा होऊ न देता सरपंचपदासह १७ पैकी ११ जागा जिंकून घड्याळाची टिकटिक बंद पाडली.

करंजावणे येथे राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या पॅनेलमध्ये होते. पक्षीय पातळीऐवजी सर्वच पॅनेलने अपक्ष म्हणून नशीब अजमावले. पक्षीय पातळीपेक्षा भाऊबंदकीचा वाद आणि जथ्याचे राजकारणच तेथे अधिक प्रभावी ठरले. त्यात सरपंच शांतिदेव शिंदे यांच्या सत्तेला सुरूंग लावत संतोष दौंडकर यांनी सरपंचपदावर वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांच्या पत्नी मंगल दौंडकर यांनी मोठा विजय मिळविला. मंगल दौंडकर यांच्यासह आरती शांतीदेव शिंदे, ॲड. सुमिता संपतराव दौंडकर या माजी सरपंचांत येथे तिरंगी लढत झाली.

रांजणगाव एमआयडीसी लगत असलेल्या सोनेसांगवी गावचे गावपण गेल्या काही वर्षांत हरवले असून, औद्योगिकरणाची व त्यामाध्यमातून आलेल्या आभासी सुबत्तेची आणि जीवघेण्या स्पर्धेची लागण या गावालाही काही अंशी झाल्याचे अलिकडच्या काही वर्षातील चित्र होते. विद्यमान सरपंच दत्तात्रेय कदम यांच्यापूर्वी त्यांच्या पत्नी अलका कदम या सरपंच होत्या. या निवडणूकीत त्यांनी पुन्हा पत्नीलाच रिंगणात उतरविण्याचा निर्धार केल्यानंतर, एकेकाळचे त्यांचेच कट्टर पण 'गावकारभारकी' आपल्या हाती यावी यासाठी प्रयत्नशील असलेले काही महत्वाकांक्षी कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले.

प्रस्थापित पक्षांपासून दूरावलेल्या नेते - कार्यकर्त्यांना हल्ली बाळासाहेबांची शिवसेना हा अगदी जवळचा व हक्काचा पर्याय झाल्याने महत्वाकांक्षी कार्यकर्त्यांचा हा मोठा जथ्था माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून थेट बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेशकर्ता झाला. गावपातळीवर उठाव केलेल्या या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी गावातही 'शिंदे पॅटर्न' वापरला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची १५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली.

काठापूर खुर्द मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच दोन गटांत निकराची लढत झाली. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मानणाऱ्या या कार्यकर्त्यांत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी समेटाचा केलेला प्रयत्न अपयशी ठरल्याने, ते एकमेकांना भिडले. त्यात एका गटाला सरपंचपद तर एका गटाकडे सदस्यपदाचे बहुमत गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT