Mangaladas Bandal-Ashok Pawar Sarkarnama
पुणे

Bandal Vs Pawar : खुमखुमी गेली नसेल तर आणखी बरेच विषय आहेत : आमदारकीचा राजीनामा मागणाऱ्या बांदलांना पवारांचा इशारा

बांदल यांनी जिजामाता सहकारी बॅंक आणि पुणे बाजार समितीमधील राष्ट्रवादीच्या पराभवाला आमदार अशोक पवार यांना जबाबदार धरले

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : माझी सर्व तयारी झाली आहे, लोकसभेची आगामी निवडणूक आपण कोणत्याही परिस्थितीत लढवणारच आहे, असे पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी सांगितले. (MLA Ashok Pawar's warning to Mangaladas Bandal)

मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांनी जिजामाता सहकारी बॅंक आणि पुणे बाजार समितीमधील राष्ट्रवादीच्या पराभवाला आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांना जबाबदार धरले. या दोन्ही निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून ॲड. अशोक पवार यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, महिनाच झालाय बाहेर (जेलमधून) आलेल्या आणि शिळ्या कढीला उत आणणाऱ्यांची खुमखूमी गेली नसेल तर आणखी बरेच विषय आहेत, जे जनतेसमोर आणावे लागतील, असा इशारा प्रत्युत्तरात आमदार अशोक पवार यांनी मंगलदास बांदल यांना दिला आहे.

वरिष्ठ नेतेमंडळींनी पुणे बाजार समितीच्या निवडणुकीत समन्वयाची भूमिका घेण्याची सूचना केली होती. त्यानंतरही आमदार पवार यांनी मनमानी करत पॅनेल उभे केले. तसेच, जिजामाता सहकारी बॅंकेची निवडणूकही केवळ पवारांच्या भूमिकेमुळेच लागली, असा आरोपही बांदला यांनी केला.

ते म्हणाले की, पुणे बाजार समितीची निवडणूक ही वीस वर्षांनंतर होत होती. त्यामुळे ही निवडणूक सर्वांशी चर्चा करून आणि संयमी भूमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतली होती. पण, आमदार पवार यांनी मात्र आपल्याच बगलबच्च्यांचे पॅनेल उभा केले. त्यामुळे पक्षाचेही लोक दुखावले गेले. डावलल्याच्या भूमिकेतून त्यांनी शिवसेना, भाजप व इतर पक्षातील लोकांशी संगनमत करत बाजार समिती जिंकली. पराभवामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली. त्यालाही अशोक पवारच जबाबदार आहेत.

जिजामाता बॅंकेची निवडणूकही बिनविरोध केवळ अशेाक पवारांच्या भूमिकेमुळे होऊ शकली नाही. त्यांनी पॅनेल उभे करून आणि ताकद लावूनही त्यांच्या पॅनेलचा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे बॅंक आणि बाजार समितीमधील पराभव हा आमदार अशोक पवार यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. त्यामुळे या निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदार अशोक पवार यांनी राजीनामा द्यावा, असेही बांदल यांनी म्हटले आहे.

पुणे बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या आदेशानुसार पक्षाचा अधिकृत पॅनेल उभा होता. त्यात पक्षशिस्तीचे पालन करून पक्षाचा एक निष्ठावंत पाईक म्हणून प्रचार यंत्रणा राबविली. ती मनमानी होऊ शकत नाही. उलट उमेदवारी न मिळालेल्या स्वार्थी नाराजांनी पक्षशिस्त मोडून गैरमार्ग अवलंबला. विरोधक सतत तेच आरोप करीत असतील तर उत्तर देत बसायला वेळ नाही. महिनाच झालाय बाहेर आलेल्या आणि शिळ्या कढीला उत आणणाऱ्यांची खुमखूमी गेली नसेल तर आणखी बरेच विषय आहेत, जे जनतेसमोर आणावे लागतील, असा इशाराही आमदार अशोक पवार यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT