Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी रोज रांगा लागत आहेत. अनेक नेते पक्षप्रवेश करण्यासाठी इच्छुक असून यामध्ये बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) नेते असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच अजितदादांबरोबर असलेल्या पुण्यातील दोन आमदारांनी विधानसभेच्या दृष्टीकोणातून महत्त्वपूर्ण असलेल्या मेळाव्याला दांडी मारल्यानं उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं ( अजितदादा पवार ) आयोजित केलेल्या नियोजन बैठकीला शहरातील आमदार चेतन तुपे ( Chetan Tupe ) आणि सुनील टिंगरे यांनी दांडी मारली. बैठकीला उपस्थित राहण्याचा निरोप देऊनही आमदारांनी दांडी मारल्याने त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यामुळे शहराच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्त्वाखाली सेंट्रल पार्कमध्ये झालेल्या या मेळाव्यास राष्ट्रवादी व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी, शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी पौर राजलक्षी भोसले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, बाळासाहेब बोडके, रूपाली पाटील ठोंबरे, सदानंद शेट्टी, बंडू केमसे, तसेच महेश शिंदे, युवक अध्यक्ष समीर चांदेरे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे दोन ठराव...
'भविष्यात अजितदादा पवार ( Ajit Pawar ) मुख्यमंत्री झाले पाहिजेत. तसेच, बारा राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून दीपक मानकर यांना विधानपरिषदेवर पाठवावे,' असे दोन ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.
टिंगरेंसमोर आव्हाने...
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुनील टिंगरे हे ठामपणे अजितदादांबरोबर राहिले. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून टिंगरे यांचे तिकीट वडगाव शेरीतून 'फिक्स' असल्याचं चित्र आहे. असं असताना टिंगरेंपुढे मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. एकीकडे महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या भाजपने सुनील टिंगरेंच्या उमेदवारीला विरोध केला आहे. उमेदवारी निश्चित झाल्यास आम्ही काम करणार नाही, असा इशाराही भाजपने दिला आहे.
टिंगरे चक्रव्यूहात...
दुसरीकडे माजी आमदार बापू पठारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( शरदचंद्र पवार ) घेत टिंगरेंविरुद्ध जोरदार तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांनी वडगाव शेरीत मेळावा घेत टिंगरेंवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे चक्रव्यूहात अडकलेले टिंगरे नेमकी कोणती भूमिका घेणार, याबद्दल संभ्रम आहे.
उद्योगपतीच्या मध्यस्थीनं तुपे पुन्हा घरवापसी करणार?
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर काही काळ शरद पवार यांच्याबरोबर असलेले हडपसरचे आमदार चेतन तुपे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांसोबत स्थिरावल्याचे पाहायला मिळाले. पण, एका बड्या उद्योगपतीच्या मदतीने तुपे हे पुन्हा शरद पवारांबरोबर जाण्यासाठी वाटाघाटी करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
तळ्यात की मळ्यात?
त्या पार्श्वभूमीवर पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दोन्ही आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे हे आमदार तळ्यात आहे की मळ्यात, अशा चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत.
चांगलं किवा वाईट अजितदादांबरोबर होईल...
याबाबत 'सरकारनामा'शी बोलताना आमदार सुनील टिंगरे म्हणाले, "माझी प्रकृती ठीक नसल्यानं मेळाव्याला जाता आले नाही. पण, मी अजितदादांसोबत राहणार आहे. माझे जे चांगलं आणि वाईट व्हायचे आहे, ते अजितदादांबरोबर होईल."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.