Rahul Kul Sarkarnama
पुणे

Rahul Kul In Haveli: आमदार राहुल कुल हवेलीत येऊन म्हणतात, ‘मैंने तुझको दिल दे दिया...’

Vijaykumar Dudhale

Pune Political News: भारतीय जनता पक्षाचे दौंडचे आमदार राहुल कुल यांचा हवेली तालुक्यातील राजकारणात बऱ्यापैकी दबदबा वाढला आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत बाजार समिती फक्त हवेलीकरांचीच होण्यासाठीचे त्यांचे डावपेच कोणीही विसरणार नाही. या राजकीय मैत्रीतूनच त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने रविवारी (ता. २४ सप्टेंबर) हवेलीत भेटीगाठी घेतल्या आणि चक्क ‘सब कहते है मैंने तुझको दिल दे दिया...’ हे गाणेही गायले. (MLA Rahul Kul comes to the haveli and says, 'Maine tujhko dil de diya...')

आमदार राहुल कुल यांना या गाण्यासाठी शिरूर-हवेली विधानसभेचे प्रमुख इच्छुक प्रदीप कंद, भाजपच्या क्रीडा विभागाचे प्रदेशाध्यक्ष पहिलवान संदीप भोंडवे, माजी सभापती मंगलदास बांदल, शशिकांत दसगुडे, भाजप तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे आणि श्याम गावडे यांनी साथ दिली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे सर्व एकत्र आले असले तरी या सर्व मित्रमंडळींची नजर विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीवर आहे, हे नाकारून चालणार नाही. याशिवाय हवेलीच्या भाजपच्या बहुतेक घडामोडी या दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याच म्हणण्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात, हेही गेल्या काही दिवसांत सिद्ध झाले आहे.

पुणे बाजार समितीचे कार्यक्षेत्र केवळ हवेली तालुक्यापुरते मर्यादित करण्याचा सरकारचा निर्णय, हवेली तालुका बाजार समिती निवडणूक आणि निवडणुकीतील निकाल हे बहुतांश भाजपच्या पथ्यावर पडून घेण्याची रणनीतीही आमदार कुल यांच्याच नियोजनाखाली झाल्याचे हवेलीतील अनेक जण जाणतात.

राहुल कुल यांचे राजकीय महत्त्व आणि त्यांच्याशी मैत्री राजकारणासाठी कशी पथ्यावर पडेल, याचा प्रयत्न हवेलीतील प्रत्येकाकडून सुरू आहे. त्यात आता कुल यांनीच ‘सब कहते है मैंने तुझको दिल दे दिया...’ गाणे हवेलीतील नेतेमंडळींच्या साथीने म्हणणे, याचे राजकीय अर्थ येत्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी वाटपातच कळतील, हे मात्र नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT