Vasant More and Nilesh Mazire
Vasant More and Nilesh Mazire  Sarkarnama
पुणे

राजकारण तापलं! मनसे सोडताना वसंत मोरेंच्या कट्टर समर्थकानं दाखवलं दोन नेत्यांकडं बोट

सरकारनामा ब्युरो

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) पुण्यात आणखी एक धक्का बसला आहे. मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्या माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे (Nilesh Mazire) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांचे कट्टर समर्थक आहेत. पक्ष सोडत असतानाच माझिरे यांनी पक्षातील दोन नेत्यांकडे बोट दाखवलं आहे. (Nilesh Mazire quits MNS)

मनसे सोडण्याविषयी बोलताना निलेश माझिरे म्हणाले की, मी पक्ष सोडण्याचं मुख्य कारण हे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर आहेत. तसेच, कोअर कमिटीतील इतर सदस्य याला कारणीभूत आहेत. मी मनसे सोडणार असल्याच्या बातम्या 19 मे रोजी काही माध्यमांत आल्या होत्या. त्यानंतर माझिरे यांची हकालपट्टी करा, असं बाबर म्हणाले होते. तू पक्षात राहणार आहेस का? अशी विचारणा वागस्कर यांनी केली होती. मला बोलावून घेऊन तुम्ही पक्षात राहणार का? असं विचारणं म्हणजे हुकूमशाहीच आहे.

मी पक्ष सोडण्यायाबाबत वसंत मोरेंना मेसेज पाठवला आहे. त्यांनी तरी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी किती वेळा बोलावं. मी वसंत मोरे यांचा समर्थक असल्याने माझं माथाडी कामगार सेनेच शहराध्यक्ष पद काढून घेतलं का? मी कोअर कमिटीलाच नको होतो, असा आरोपही माझिरे यांनी केला आहे.

वसंत मोरे यांना पक्षात बाजूला करण्यात आले आहे. यानंतर मनसेला आता पुण्यात हा आणखी एक धक्का बसला आहे. मागील काही दिवसांपासून मनसेत अंतर्गत वाद सुरू आहेत. यामुळे पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून निलेश माझिरे यांनी पक्ष सोडला आहे. दरम्यान, त्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे संपर्क नेते सचिन अहिर यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, त्यावेळी माझिरे यांनी पक्षातच राहणार असल्याचा खुलासा केला होता. माझिरे यांनी पक्ष सोडला असला तरी ते कुठल्या पक्षात जाणार हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेलं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयावर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केल्यातनंतर पक्षाच्या शहराध्यक्ष पदावरून त्यांना हटवण्यात आले होते. त्यानंतर साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून मोरेंना वारंवार डावललं जात आहे. यावर राज ठाकरे हे शहर कार्यालयात येत नाहीत, तोपर्यंत शहर कार्यालयात जाणार नाही, अशी भूमिकाही वसंत मोरे यांनी जाहीरपणे घेतली होती. तेव्हापासून मोरे आणि मनसे पदाधिकारी यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT