पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) पुण्यात आणखी एक धक्का बसला आहे. पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देण्याचे सत्र पुण्यात सुरूच आहे. मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्या माजी शहराध्यक्षांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. निलेश माझीरे (Nilesh Mazire) यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांचे कट्टर समर्थक आहेत. (Nilesh Mazire quits MNS)
वसंत मोरे यांना पक्षात बाजूला करण्यात आले आहे. यानंतर मनसेला आता पुण्यात हा आणखी एक धक्का बसला आहे. मागील काही दिवसांपासून मनसेत अंतर्गत वाद सुरू आहेत. यामुळे पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून निलेश माझिरे यांनी पक्ष सोडला आहे. दरम्यान, त्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे संपर्क नेते सचिन अहिर यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, त्यावेळी माझिरे यांनी पक्षातच राहणार असल्याचा खुलासा केला होता. माझिरे यांनी पक्ष सोडला असला तरी ते कुठल्या पक्षात जाणार हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेलं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुकाणू समितीच्या बैठक नुकतीच झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मनसेचे वसंत मोरे गैरहजर होते. मोरेंना बैठकीला डावलण्यात आल्याची चर्चा मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे. यावर मोरे म्हणाले होते की, सोशल मीडियाच्या माध्यमातून सुकाणू समिती बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. अलीकडे सुकाणू समितीच्या बैठकीची कार्यपद्धती बदलली आहे. बैठकीचा निरोप सोशल मीडियातून दिला जातो. तसा तो मला मिळाला. बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कोणताही दूरध्वनी नव्हता. मात्र अन्य कार्यक्रमांमुळे मी बैठकीला नव्हतो.
मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयावर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केल्यातनंतर पक्षाच्या शहराध्यक्ष पदावरून त्यांना हटवण्यात आले होते. त्यानंतर साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून मोरेंना वारंवार डावललं जात आहे. यावर राज ठाकरे हे शहर कार्यालयात येत नाहीत, तोपर्यंत शहर कार्यालयात जाणार नाही, अशी भूमिकाही वसंत मोरे यांनी जाहीरपणे घेतली होती. तेव्हापासून मोरे आणि मनसे पदाधिकारी यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.