पुणे : राज्यात भोंग्याच्या प्रकरणावरुन वातावरण तापलं आहे. याबाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. या वेळी पुण्यातील मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तालयात या भेटीसाठी उशिरा पोचलेले नगरसेवक वसंत मोरेंनी (Vasant More) यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली आहे. यामुळे ते पक्षात एकाकी पडल्याचे चित्र आहे. (Vasant More Latest News in Marathi)
पोलीस आयुक्तालयात वसंत मोरे आज उशिरा पोचले. यावर त्यांना विचारले असता त्यांनी पार्किंगला जागा मिळाली नाही, असं कारण पुढं केल. याचबरोबर पोलीस आयुक्तांसोबतच्या भेटीचा निरोप देण्यात आलेला नव्हता, असेही त्यांनी बोलून दाखवलं. ते म्हणाले की, आजच्या भेटीबाबत फक्त ग्रुपवर सांगण्यात आलं होतं. राज ठाकरेंच्या आदेशानुसार मी इथं आलो. पक्षातल्या कुठल्याच पदाधिकाऱ्याशी माझा संवाद नाही.
पुण्यातील मनसेतील घडामोडी पाहता वसंत मोरे हे एकटे पडल्याचे चित्र आहे. त्यांना पदाधिकाऱ्यांकडून डावलले जात आहे. यावर वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. मोरे म्हणाले की, शहर पातळीवर पक्षात मला टाळलं जात आहे. मी कुणालाही टाळत नाही पण मलाच ते टाळत आहेत. आता राज ठाकरे येतील त्यावेळीच मी पक्ष कार्यालयात जाईन.
मुंबई पोलिसांनी भोंग्याच्या आवाजाच्या पातळीबाबत पत्रक काढले आहे. तसेच पत्रक पुणे पोलिसांनी काढावे, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केली. मुंबई पोलिसांनी आवाजासंदर्भात नियमावली जाहीर केली आहेत. त्याच प्रकारचा निर्णय पुणे पोलिसांनी घ्यावा, असा मनसेचा आग्रह आहे. मनसेच्या शिष्टमंडळात पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह बाबू वागस्कर, बाळा शेडगे, गणेश सातपुते उपस्थित होते. पण नेमके वसंत मोरे उशिरा पोचल्याने चर्चांना उधाण आले.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, आवाजाच्या नियमावलीबाबत आम्हाला लोकांचे फोन येत आहेत. याबाबत पोलिसांनी माहिती नाही दिली तर आम्ही पक्ष म्हणून निर्णय घेऊ. पुढील दहा दिवसांत पुणे पोलिसांनी आम्हाला माहिती देण्याचे आश्वासन दिलं आहे. त्यांच्या निर्णयानंतर आम्ही पुढील भूमिका जाहीर करू.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.