Vasant More with Sharmila Thackeray Sarkarnama
पुणे

भीतीनं पोटात गोळा आला होता..! वसंत मोरेंनी मन मोकळं केलं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी भेट घेतली.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) व शर्मिला ठाकरे यांची सोमवारी माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी भेट घेतली. मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरुन मोरे यांच्याकडून शहराध्यक्ष पद तडकाफडकी काढण्यात आलं होतं. आजच्या भेटीनंतर मोरे यांची नाराजी दूर झाली असून त्यांनी फेसबुक पोस्टवरून याबाबत 'मी आपला इथेच बरा...' पक्षातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. (Vasant More News updates)

वसंत मोरेंनी सोमवारी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर मोरे यांनी दोन फेसबुक पोस्ट केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी राज ठाकरेंसोबतचे छायाचित्र टाकले आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मी माझ्या साहेबांसोबत...आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही...! जय श्रीराम.' काही तासांनी त्यांनी आणखी एक पोस्ट केली आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी राज ठाकरे यांचे पाय धरतानाचा आणि शर्मिला ठाकरे यांच्यासोबत संवाद साधतानाचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच त्यावर म्हटलं आहे की, 'आयुष्यात खूप पदं मिळाली. तीही कामाच्या आणि ऐकनिष्ठेच्या जीवावर. पद काय आज आहे उद्या नाय ओ पण माझं जे स्थान "माझा वसंत" हे जे काही काळासाठी डळमळीत झालं होतं पण तिथं गेल्यावर (शिवतीर्थावर) समजले, आरे इथे तर मी काहीच हरवले नाही उगाचाच भीतीने पोटात गोळा आला होता. म्हणूनच मी म्हणतो मी आपला इथेच बरा...'

दरम्यान, भेटीनंतर मोरेंनी माध्यमांशी संवाद साधून आपण 100 टक्के समाधानी असल्याचे जाहीर केले आहे. राज ठाकरेंनी उद्याच्या ठाण्यातील सभेचे आमंत्रण दिल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ठाण्याची सभा ही उत्तरसभा आहे. या सभेत राज ठाकरे हे अनेक प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. मला राज ठाकरेंनी या सभेला बोलावलं असून, सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे सांगितले आहे. मी आधीपासून सांगत होतो की मनसेत राहणार आहे.

पुणे शहराध्यक्ष पदावरुन दूर केल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याची पुण्यातील त्यांच्या समर्थकांसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. आज त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत मनसेचे नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि इतर काही पदाधिकारी उपस्थित होते. मोरे यांनी सुरवातीला शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी काही काळ चर्चा केल्यानंतर ते राज ठाकरेंना भेटले. मोरे हे मनसे सोडून इतर पक्षात जातील, अशी चर्चा सुरू होती. याबद्दल या भेटीनंतर विचारताच मोरेंनी सगळ्या ऑफर संपल्याचे सांगितले. यामुळे ते मनसेतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मशिदींवरील भोंग्यांबाबत राज यांच्या विधानाला विरोध करणारी भूमिका वसंत मोरेंनी घेतल्यानंतर त्यांना पुणे शहराध्यक्ष पदावरुन हटविण्यात आले. त्यानंतर त्यांनी अनेकदा राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. पण तातडीने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर रविवारी राज ठाकरेंनी प्रतिसाद दिल्यानंतर भेटीची वेळ निश्चित झाली, त्यानुसार मोरे आज राज ठाकरेंना भेटले आहेत. त्यामुळे आजच्या भेटीकडे लक्ष लागले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT