Raj Thackeray Sarkarnama
पुणे

Raj Thackeray On BJP : राज ठाकरे भाजपला चार हात लांबच ठेवणार? युतीवरून फटकारले

MNS News: भाजप आणि मनसेच्या युतीसंदर्भात राज ठाकरे यांनी भाष्य केलं

सरकारनामा ब्यूरो

Pune News: ठाकरे सरकारच्या काळात नव्या मित्रांची जुळवाजुळव करून राजकीय ‘पत’ वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जवळीक वाढविलेल्या; पण शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीतील फुटीरांना जवळ केलेल्या भाजपला, संभाव्य ‘युती’च्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी धुडकावले. 'कोणी कधी भेटले म्हणून युती होत नसते', असे स्पष्टपणे सांगत राज यांनी भाजपला आता लांबच ठेवणार असल्याचे सूचित केले.

नवी सत्ता समीकरणे जुळवताना काही महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीगाठी घेतल्याचं पाहायला मिळालं. यावरूनच आगामी निवडणुकीत भाजप-मनसेत युती होईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. मात्र, मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेल्या टोल तोडफोडीच्या प्रकरणानंतर भाजप आणि मनसेत चांगलीच जुंपली आहे. टोलच्या तोडफोडीवर राज यांनी भूमिका स्पष्ट करत भाजपवर जहरी टीका करत भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चांवर भूमिका स्पष्ट केली.

राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांना मनसे आणि भाजपच्या युती संदर्भात प्रश्न विचारला असता, "मनसेने कुठल्याही पक्षाशी युती केलेली नाही. भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही. कोणीही कोणालाही भेटलं की युत्या होत नसतात. बाळासाहेब ठाकरे यांचे पुस्तक प्रकाशित केले तेव्हा मंचावर शरद पवार उपस्थित होते, मग लगेच युती झाली का?", असा उलट प्रश्न करत भाजपला चार हात लांबच ठेवणार असल्याचे संकेत दिले.

शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यानंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी वाढल्यामुळे भाजप-मनसेत युती होईल, असं बोललं जात होतं. मात्र, यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीही (अजित पवार गट) सामील झाल्यामुळे भाजप-मनसेतील मतभेद वाढल्याचे चित्र आहे.

त्यातच अमित ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान सिन्नर येथे झालेल्या टोलच्या तोडफोडीनंतर भाजप-मनसेत मिठाचा खडा पडला आहे. भाजप नेते गिरीश महाजनांनी काही दिवसांपूर्वीच अमित ठाकरेंचे विधान बालिश असल्याचे म्हणत माध्यमांसमोरच मनसेला डिवचले. त्यानंतर मनसेच्या नेत्यांकडून भाजपला जोरदार प्रतित्युत्तर देण्यात आले. यानंतर राज ठाकरेंनी सिन्नरच्या तोडफोडीचे समर्थन करत "तो (अमित ठाकरे) काही सगळीकडे टोलनाके फोडत फिरत नाही", असे उत्तर ठाकरे स्टाइलने दिले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT