Mns Raj Thackeray Sarkarnama
पुणे

Raj Thackeray News : राज ठाकरेंनी भाजपला पाठींबा देताच 'मनसे'तून गळतीला सुरूवात !

Chaitanya Machale

MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला पाठींबा देण्याचा निर्णय घेताच मनसेमध्ये गळतीला सुरूवात झाली आहे. ठाकरे यांनी शिवतीर्थ येथ झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात भारतीय जनता पक्षाला मंगळवारी बिनशर्त पाठींबा देण्यााचा निर्णय घेतला. ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. हा निर्णय होऊन काही तास होत नाही तोच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देण्यास सुरूवात केली आहे.

मनसेचे (MNS) जुने पदाधिकारी आणि सरचिटणीस असलेल्या कीर्तीकुमार शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम केला आहे. राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठींबा देत लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर अवघ्या बारा तासातच नाराज झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरूवात केली आहे. मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुकवर केंद्रीय मंत्री अमित शाह, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो प्रसिद्ध करत त्यावर 'अलविदा मनसे' असा मजकूर लिहित पोस्ट शेअर केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेच्या (LOKSABHA) निवडणुकीत काही जागांवर उमेदवार देणार असे सुरूवातीच्या काळात बोलले जात होते. त्यानंतर चार ते पाच जागा स्वबळावर लढणार असल्याची चर्चा होती. जशी लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर मनसे भाजपला पाठींबा देणार असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली तलवार भाजप- शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीसमोर म्यान केली असून महायुतीला पाठींबा देत दोन जागांवर मनसे निवडणूक लढणार असल्याचे देखील बोलले जात होते.

या पार्श्वभूमीवर गेल्या महिना दोन महिन्यापासून विविध तर्कवितर्क काढले जात होते. या दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री अमित शाह यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे (RAJ THACKERAY) यांनी दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यामध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसेची भूमिका जाहीर करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी शिवतीर्थ येथे मनसेचा मेळावा झाला. त्यामध्ये ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाषण केले.

आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात गेल्या दोन महिन्यातील चर्चा, बातम्या, विकास,याचा आढावा ठाकरे यांनी घेतला. देशाच्या विकासासाठी आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे, असे सांगत मनसे 'भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. असे जाहीर केले. ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेमधील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरली असल्याचे पहायला मिळत असून त्याचे पडसाद म्हणून येणाऱ्या काळात अनेक निष्ठावंत मनसैनिक पक्षाला जय महाराष्ट्र करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये कीर्तीकुमार शिंदे काय म्हणाले..

अलविदा मनसे!

पाच वर्षांपूर्वी २०१९ लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप- मोदी- शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर- 'लाव रे तो व्हिडिओ' सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजप- मोदी- शाह यांच्या विरोधात जे तथ्य- विचार मांडत होते त्यांबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो.

आज ५ वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचं काय?

गेल्या १० वर्षांत, त्यातही विशेष करून मागच्या ५ वर्षांत 'भामोशा'ने देशाचं अक्षरशः वाटोळं केलं आहे. पारदर्शक कारभाराचा दावा करत सत्तेवर येऊन 'भामोशा' अपारदर्शक हुकूमशाहीने दडपशाही करत आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या चौकशांचा ससेमिरा पाठीमागे लावून भाजपेतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना गजाआड पाठवण्याची भीती दाखवून वॉशिंग मशीनमध्ये घालून त्यांचे शुद्धीकरण करून त्यांचे 'भामोशा'मध्ये सक्तीने पक्षांतर करवून घेतले जात आहे. 'भामोशा'चे विचार ज्यांना पटतात ते राष्ट्रप्रेमी किंवा हिंदू, आणि 'भामोशा'च्या विरोधात आहेत ते राष्ट्रद्रोही किंवा अहिंदू! या नव्या समीकरणामुळे जातपातधर्माच्या नावाखाली माणसाला माणूसपणापासून तोडण्याचे काम सुरू आहे. अत्यंत नम्रपणे सांगतो की, प्रबोधनकारांची अनुपलब्ध पुस्तके प्रकाशित करून त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्याला 'भामोशा'चं असलं राष्ट्रीयत्व- 'हिंदुत्व' मान्यच होऊ शकत नाही.

कीर्तिकुमार शिंदे

Kirtikumar Shinde MNS

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT