murlidhar mohal jagdish mulik  sarkarnama
पुणे

Pune Bjp : पक्षाच्या सर्व्हे आधीच भाजप इच्छूकांचे दिल्लीश्वरांकडे साकडे

Chaitanya Machale

Pune News : लोकसभेच्या निवडणुकीत भाजपकडून पुण्याचा उमेदवार कोण असेल याबाबत विविध चर्चांचे खल रंगात आहेत. त्याचाच भाजपचे मुरलीधर मोहळ, जगदीश मुळीक आणि सुनील देवधर यांनी कार्यक्रमाचा सपाट लावून आपली उमेदवारी बळकट करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

कोणत्याही निवडणुकी पूर्वी भाजपच्या वतीने सर्व्हे केले जातो. लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील असा सर्वे होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुणे भाजप कडून याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला असून त्यासाठी "ग्रीन सिग्नल" मिळाल्यानंतर शहरात उमेदवारांचा सर्व्हे केला जाणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर पुणे लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. तिकीट आपल्याला मिळावे, यासाठी गेल्या वर्षेभरापासून इच्छूकांनी जोरदार काम सुरू केले आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे शहरात गेल्या दहा वर्षापासून लोकसभेची जागा भाजपच्या ताब्यात आहे. एकेकाळी पुणे लोकसभेची जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. खासदार सुरेश कलमाडी हे अनेक वर्षे खासदार म्हणून काम करत होते. काँमन वेल्थ घोटाळ्यात खासदार कलमाडी यांचे नाव येऊन त्यांना तुरूंगवास भोगावा लागल्यानंतर 2014 मध्ये काँग्रेसने कलमाडी यांना तिकीट नाकारून माजी मंत्री पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी सांगलीवरून उमेदवार आयात केल्याची टीका झाली होती. या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी कदम यांचा पराभव केला. त्यानंतर आजपर्यंत या जागेवर भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे.

पाच वर्षापूर्वी 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार शिरोळे यांना तिकीट न देता गिरीष बापट यांना तिकीट दिले. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून मोहन जोशी यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अरविंद शिंदे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र अखेरच्या क्षणी दिल्ली येथून सूत्रे हलली आणि मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यावेळी भाजपचे बापट यांना बाय देण्यासाठीच उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली होती. खासदार बापट यांचे मार्च 2023 मध्ये निधन झाले. त्यामुळे पुणे लोकसभेसाठी पुन्हा निवडणूक होणार हे निश्चित होते. त्यासाठी गेल्या नऊ महिन्यांपासून भाजपमधील अनेक इच्छूकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर न केल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. आता लोकसभेची मुदत संपत असल्याने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी आता भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्षातील इच्छूकांनी सुरू केली आहे. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह सुनील देवधर यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी कोणाचे नाव अधिक पसंतीमध्ये उतरेल, यासाठी सर्व्हे केला जाणार आहे. हा सर्व्हे करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याला दुजोरा दिला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारानेच एका खासगी संस्थेकडून सर्व्हे करून तो भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठविला होता. त्यामुळे या सर्व्हेच्याच आधारे त्यांना तिकीट मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पराभव स्विकारावा लागला. लोकसभेच्या निवडणुकीत अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी विशेष काळजी भाजपकडून घेतली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT