Amol Kolhe
Amol Kolhe sarkarnama
पुणे

काही लपवायचं तर, नाही ना? महापालिकेच्या प्रेक्षक गॅलरीत कोल्हेंनी ठोकला चार तास तळ

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला (जनरल बॉडी-जीबी) राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी गुरुवारी (ता.२०) अचानक हजेरी लावली. अशी उपस्थिती लावणारे ते पहिले खासदार ठरल्याने त्याची चर्चा होणे ओघाने आलेच. पण, सभा सुरु होऊन चार तास उलटले. तरी विषयपत्रिकेला सुरवात झाली नाही. त्यामुळे सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत चार तास तळ ठोकून बसलेल्या कोल्हेंनी काय गडबड आहे? काही लपवायचे तर नाही ना? अशी सूचक विचारणा महापालिकेतील सत्ताधारी भाजपला ट्विटव्दारे केली. त्यातून गेले पावणेपाच वर्षातील भाजपच्या पालिकेतील कारभाराचा त्यांचा उद्वेग दिसून आला. (MP Amol Kolhe attended the meeting of the corporation in the audience gallery)

दरम्यान, शहराचे प्रतिनिधीत्व करणारे कोल्हेच सभागृहात आल्याने नेहमी लवकर गुंडाळली जाणारी सभा खूप वेळ चालली. चर्चा झाली. विरोधकांना बोलू दिले गेले. त्याचा फायदा घेत राष्ट्रवादीचे सदस्य अधिकच तावातावाने बोलले. स्मार्ट सिटीतील गैरव्यवहाराच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला त्यांनी पाठिंबाच दिला नाही, तर त्यात सहभागही घेतला. त्यामुळे अजेंडा बाजूलाच पडला.

चर्चा भलतीकडेच गेली. चार तास झाले, तरी विषयपत्रिकेला सुरवात न झाल्याने कोल्हेंनी प्रेक्षक गॅलरीतूनच ट्विट केले. त्याव्दारे त्यांनी सभेच्या कामकाजावर प्रश्नचनिन्ह उपस्थित केले. हीच का सत्ताधारी पक्षाची पारदर्शकता? असा प्रश्न त्यांनी विचारला. पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यावेळी त्यांच्याबरोबर होते. माजी महापौर असलेले वाघेरे यानिमित्ताने पुन्हा सभागृहात दिसले. त्यांनी आपल्या नगरसेवकांच्या सभागृहातील कामकाजाचा प्रत्यक्ष ऑंखो देखा हाल पाहिला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कारभाराविषयी गेल्या साडेचार वर्षात अनेक गोष्टी ऐकिवात होत्या. म्हणून स्वत त्याचा अनुभव घेण्यासाठी आलो होते, असे कोल्हेंनी आपल्या पालिकेतील आगमनावर सांगितले. दुपारी अडीच वाजता सभा सुरु होण्यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे राजू मिसाळ यांच्या कार्यालयात पक्षाच्या नगरसेवकांची शाळा घेतली. त्यानंतर ते सभागृहात गेले. तेथे सायंकाळी साडेसहा वाजले, तरी ते प्रेक्षक सज्यात बसून होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT