MP Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Amol Kolhe News : खासदारसाहेब पाच वर्षे कुठे होता? शिरूरमध्ये लागले बॅनर

Chaitanya Machale

Pune News : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, लोकसभेसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीने काही मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहे. ज्या जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहे. त्या मतदारासंघातील उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाबरोबरच शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातील काही मतदारसंघात लावण्यात आलेले बॅनर मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार डाॅ. अमोल कोल्हे रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारासंघात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार कोणाला तिकीट देणार याबाबत मोठी उत्सुकता होती. महायुतीच्या जागावाटपामध्ये शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याने शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आढळराव पाटील यांना संधी देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही निवडणूक जाहीर झाल्यापासून खासदार कोल्हे आणि आढळराव यांच्यामध्ये जोरदार आरोप, टीकाटिप्प्णी सुरू आहे. त्यातच आता आंबेगाव तालुक्यात डाॅ . अमोल कोल्हे यांच्या विरोधात एक बॅनर लावण्यात आला असून, त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बॅनरच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांना काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. विद्यमान खासदार साहेब गेली पाच वर्षे तुम्ही कुठे होता ? पाच वर्षे मतदारसंघात नाही, पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला ? कोरोनासारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघांमध्ये का नव्हता? असे तीन प्रश्न विचारण्यात आले आहेत. खासदार साहेब उत्तर द्या, असे या बॅनरमध्ये म्हटले आहे. या बॅनरच्या खाली एक सूज्ञ नागरिक असे म्हटले आहे. हे बॅनर विरोधी गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून लावला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

खासदार झाल्यानंतर कोल्हे हे मतदारसंघात कधी फिरकलेच नाही. ते फारसे अॅक्टिव्ह नव्हते. खासदार झाल्यानंतर सहा महिन्यांतच कोल्हे राजीनामा देणार होते, असे यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नसल्याने दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावा लागल्याची टीका खासदार कोल्हे यांनी केली होती. खासदार कोल्हे यांचे काहीही कर्तृत्व नाही, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव पुढे करत ते मते मागत असल्याची टीका महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांनी केली होती. शरद पवार हे नाव सोडून कोल्हेंकडे दुसरं भांडवलच नाही. शरद पवार यांच्या नावाने मत मागण्याचे तुमचे दिवस गेलेत अशा आढळराव पाटील यांनी कोल्हे यांना खडेबोलदेखील सुनावले आहेत.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT