Amol Kolhe News Sarkarnama
पुणे

Amol Kolhe News : महागाई नियंत्रणासाठी किती दिवस शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणार? मोदी सरकारला खासदार कोल्हेंचा थेट सवाल

Central Government : केंद्राच्या चाळीस टक्के कांदा निर्यात शुल्कावर खासदार अमोल कोल्हे यांची टीका

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri-Chinchwad News : शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणाऱ्या केंद्र सरकारचे डोके ठिकाणावर आहे का अशी घणाघाती टीका शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रातील 'एनडी'ए सरकारविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावरील भाषणात १० ऑगस्टला केली होती. आता केंद्राच्या चाळीस टक्के कांदा निर्यात शुल्कावर ते पुन्हा तुटून पडले आहेत. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अजून किती दिवस शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणार आहात ? अशी संतप्त विचारणा त्यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींना रविवारी केली.

कांद्यावरील निर्यात धोरणामुळेच खासदार कोल्हेंच्या (Amol Kolhe) मतदारसंघातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) वाढदिवशी त्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. त्यावरून कोल्हेंनी केंद्र सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? अशी संतप्त विचारणा नुकतेच सूप वाजलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावरील भाषणात केली होती. तेव्हा कांद्याचे भाव कोसळल्यानंतर केंद्र सरकार हे कांदा उत्पादकांचे अश्रू पुसायला आले नसल्याबद्दल ते लोकसभेत उद्विग्न झाल्याचे पहायला मिळाले होते.

आता पुन्हा कांद्यावर या वर्षअखेरपर्यंत चाळीस टक्के निर्यात शुल्क केंद्राने (Central Government) लावताच कोल्हे भडकले आहेत. हा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे, असे ते म्हणाले. आयात-निर्यात' धोरण शेतकरी हिताचे करण्यासाठी ठोस पावले उचलावी आणि निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा अन्यायकरी निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आज पत्राव्दारे केली. कारण त्यांच्याच विभागाने हा निर्णय घेतलेला आहे.

शेतकऱ्यांचा कांदा जेव्हा बाजारात येतो, तेव्हा निर्यात शुल्क वाढवून निर्यात थांबवण्याचा घाट मोदी सरकार करते, असा आरोप खासदार कोल्हेंनी या निर्यात शुल्कावर केला. याउलट जेव्हा शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळायला सुरुवात झाली, की हेच सरकार कांदा बाहेरच्या देशांतून आयात करते ! म्हणजे माझ्या शेतकरी बांधवांना 'इकडे आड, तिकडे विहीर' असेच मोदी सरकारचे धोरण आहे, अशी तोफ त्यांनी डागली. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी किती दिवस आमच्या शेतकरी बांधवांच्या ताटात माती कालवणार आहात? असा थेट सवाल त्यांनी मोदी सरकारला केला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने लोकसभेत वारंवार आवाज उठवूनही दुर्दैवाने तो मोदी सरकारला ऐकू जात नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT